दर्शन आणि आत्मदर्शन

मानसी पटवर्धन
शनिवार, 6 जुलै 2019

पालखीच्या दिशेने तिचे ओढाळ मन धावले. पादुकांचे दर्शन घेतले. पण, त्या काही क्षणांच्या प्रवासात स्वतःचीही नवी ओळख झाली.

पालखीच्या दिशेने तिचे ओढाळ मन धावले. पादुकांचे दर्शन घेतले. पण, त्या काही क्षणांच्या प्रवासात स्वतःचीही नवी ओळख झाली.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घ्यायचेच. दुचाकी थोडी अलीकडे लावून पटकन पालखीच्या दिशेने निघाले. दर्शन घेताना सेल्फी घ्यायचा, व्हिडिओही काढायचा. मनात ठरवतच पालखीपर्यंत पोहोचले... पण, त्या सर्व गडबडीत फोन, पर्स गाडीच्या डिकीतच विसरले. पालखी तशी लांब होती आणि त्यामध्ये हा गर्दीचा मोठा लोट. आम्हा आयटीवाल्यांना ऐटीत राहायची सवय. एवढ्या गर्दीत चालायची सवय राहिलीय कुठे? आमचे आयुष्य ब्रॅंडेडने बांधलेले आहे. पण, त्या गर्दीमध्ये प्रत्येक पाऊल टाकताना मुखात विठू माउलीचे नाव घेताना कुठला ब्रॅंड आणि कुठले काय? प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मला असे वाटत होते, की साक्षात पांडुरंगानेच आपल्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. माथी जेव्हा पांडुरंगाचा टिळा कोरला गेला तेव्हा अंगावर शहारा आला. काय ताकद आहे नामस्मरणात. देहभान विसरून माणसात देव शोधायला लावते. नकळत आपल्याकडून सेवा करवून घेते. दान करायला शिकवते. अजून काय हवे आयुष्यात?

लाखो भाविक जेव्हा तहान-भूक विसरून माउलींच्या अखंड नामस्मरणाच्या गजरात बुडून जातात, तेव्हा खरेच अनुभूती येते त्या दिव्यशक्तीची. आपल्याला माणसात देव शोधायला लावतो, झालेल्या चुका पोटात घालून पुन्हा नव्याने सुरवात करण्याची उमेद देतो, त्या रक्षणकर्त्यांची. निर्मळ सेवा आणि अखंड दान हाच खरा धर्म आहे, याची जाणीव होते येथे. वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याकडे बघून एक वेगळी ऊर्जा मिळत होती. फिके आहेत आपले बाकी सर्व चोचले ह्यापुढे. सर्व काही आभासी आणि मिथ्या! आपल्यामध्ये चांगले बदल घडवून आणण्याची शक्ती, आपल्या अस्तित्वाची जाणीव, आपले ध्येय गाठण्याची ताकद असे बरेच काही मिळाले पालखीबरोबरच्या या छोट्याशा प्रवासात. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मन प्रसन्न झाले आणि मी परतीची वाट धरली. माझा मलाच खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा अनुभव होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by manasi patwardhan