डे केअर

मृणालिनी फुलगीरकर
Thursday, 16 January 2020

केवळ मुलांसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘डे केअर सेंटर’ ही आवश्यक गोष्ट बनू लागली आहे.

केवळ मुलांसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘डे केअर सेंटर’ ही आवश्यक गोष्ट बनू लागली आहे.

मी आत्तापर्यंत लहान मुलांसाठी ‘डे केअर’ पाहिले होते. पण त्या दिवशी एका अपार्टमेंटसमोर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर’ संस्थेची एक गाडी उभी होती. इमारतीमधून एक महिला आजोबांना घेऊन येत होती. बहुधा त्यांची सून किंवा मुलगी असावी, आजोबांच्या गळ्यात ओळखपत्र अडकवलेले होते. सोबत डब्बा व वॉटर बॅग. तिने त्यांना गाडीमध्ये बसवले. अगदी लहान निरागस मुलासारखे आजोबा बसले होते. त्यांना तेव्हा कल्पनाही नसेल की, आपल्या नातवंडांना ‘डे केअर’मध्ये ठेवावे लागू नये म्हणून निवृत्तीनंतर येथे येऊन राहिलो. पण, आता त्यांनाच ‘डे केअर’मध्ये जाण्याची वेळ आली. उतारवयात दोघांपैकी एकाची सोबत नसेल आणि ‘डे टू डे’ शरीराची काळजी घेतली नाही, फिटनेसकडे लक्ष दिले नाही तर मग अवयव राहत नाहीत शाबूत व मनही राहत नाही काबूत. तेव्हा ‘डे केअर’सारखे मार्ग नाइलाजाने अवलंबावे लागतात. इथे मुलांवरचे संस्कार कमी पडले, असे म्हणता येणार नाही. कारण कालमानानुसार व बदलत्या शैलीनुसार दोघांनी कमविण्याची गरज निर्माण झाली. गरजा वाढत जातात, त्यानुसार पैसे कमी पडू नयेत यासाठी सर्वांचीच धडपड चालते. अशा वेळेस ज्येष्ठांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे व जर ‘उतारवयातील सोबती’ नसेल व स्मृती नीट काम करीत नसेल तर एकटे घरात ठेवणे म्हणजे जीवावर बेतायचे प्रसंग ओढविण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, गॅस चालू राहणे किंवा बाहेर गेले तर घराचा पत्ता न आठवणे यांसारखे संभाव्य धोके लक्षात घेऊन आधीच काळजी घ्यावी लागते. त्यादृष्टीने ‘डे केअर’ हा चांगला पर्याय वाटला असेल व तिथे समवयस्क लोकांत वेळही छान जात असेल. आत्तापर्यंत ‘वृद्धाश्रम’ किंवा ज्येष्ठ आजारी व्यक्तींसाठी ‘केअर सेंटर’ पाहिले होतेच, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर सेंटर’ पाहून वाटले की खरेच ‘लहानपण देगा देवा’ म्हणतात आणि वृद्ध माणसे जणू लहान मुलांसारखीच असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by mrunalini phulgirkar