निरंजनातील वात

नीला थोरात
Friday, 20 December 2019

ऐन तारुण्यात तिच्या नशिबी दुःख व कष्टच आले. पण त्यातूनही तिने मुलांना खंबीरपणे वाढवले. त्याचेच सुख आता ती उपभोगते आहे.

ऐन तारुण्यात तिच्या नशिबी दुःख व कष्टच आले. पण त्यातूनही तिने मुलांना खंबीरपणे वाढवले. त्याचेच सुख आता ती उपभोगते आहे.

वेळात वेळ काढून मी इंदूमावशीकडे गेलेच. तिला पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या. गौर वर्ण, नऊवारी साडी, केसाचा अंबाडा, डोक्‍यावर पदर अशी तिची छबी. शिक्षण चौथीपर्यंत. आई-वडिलांनी तिचे लहान वयातच लग्न करून दिले. नवरा ट्रक ड्रायव्हर. सासू, जावू, दीर यांनी भरलेले घर. नवरा ‘टुरिंग’वरून आठ-पंधरा दिवसांनी घरी यायचा. पहिला मुलगा वर्षभरातच झाला आणि घरातल्यांना आनंद झाला. नवरा हवे-नको पाहू लागला. संसारात आणखी दोन मुलांची, एका मुलीची भर पडली. आता नवरा फारसा घरी येईनासा झाला. दारूबाटलीच्या नादाने सगळेच गमावले. शुल्लक आजाराचे निमित्त होऊन नवरा गेला. मावशी सैरभर झाली. उद्वि‌ग्न स्थितीत, खिन्न बसून राहायची. तिच्या नशिबी जे जिणे आले त्यात तिचा काय दोष! तिला टोचून बोलणाऱ्या जिभा मात्र सतत टोचायची संधीच शोधत असत. घरात कुरबुरी सुरू झाल्या. घरच्यांनी मुलांसकट घराबाहेर काढले. पण तिच्या अंतःकरणात कोणाबद्दल द्वेष नव्हता. मत्सर नव्हता. ती प्रेमाचा डोंगर व मायेचा सागर होती.

शेवटी गणेशपेठेत पत्र्याच्या खोलीत राहून मुलांसाठी कष्ट करू लागली. धुणी-भांडी, बाळ-बाळंतणीला अंघोळ घालणे, गोवऱ्या लावणे, आचाऱ्याच्या हाताखाली लाडू वळणे ही कामे करून मुलांना वाढवत होती. तिने कोणापुढे हात पसरले नाही. थोरल्या दोन मुलांना शिवाजीनगर येथील रिमांड होममध्ये ठेवले. खूप कष्ट सोसले. आता तिच्या जीवन प्रवासात सुंदर टप्पा आला आहे. मार्गी लागलेल्या मुलांकडे, त्यांच्या संसाराकडे पाहताना ती सुखावली आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करीत घराचे स्वप्न साकार झाले आहे. या वयात कृश शरीराला घेऊन ती रांचीपर्यंत विमान प्रवास करून आली. आनंद रोख, दुःख उधार अशी वृत्ती ठेवीत, ती पतवंडाच्या मेळाव्यात हरखून गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by neela thorat