आनंददायी बदल

पूजा पराग सामंत
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

कोणताही बदल पटकन स्वीकारण्यास आपले मन सुरुवातीला तयारच नसते. मनात भीती असते, बदल केल्यानंतर गोष्टी पूर्वीसारख्या घडतील की नाही?

कोणताही बदल पटकन स्वीकारण्यास आपले मन सुरुवातीला तयारच नसते. मनात भीती असते, बदल केल्यानंतर गोष्टी पूर्वीसारख्या घडतील की नाही?

जवळ जवळ वर्षापूर्वी आम्ही नवीन घरात राहायला आलो. आधीचे घर सोडताना खूप वाईट वाटले. घर बदलताना मनात किंतू होताच. हा बदल स्वीकारण्यास मन कुरकुर करत होते. पण आता वाटते बदल हा चांगला देखील असतो. कारण आमचे आताचे घर निसर्गाशी जवळीक साधणारे आहे. घराच्या तिन्ही बाजूंना झाडेच झाडे आहेत, निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलीने मन प्रसन्न राहते. आयुष्यात चांगला बदल आवश्यक आहे. बदल मग तो स्वभावात असेल, जागेत असेल, नाहीतर आहारात, विचारसरणीत असेल. आमचे आठ जणांचे एकत्र कुटुंब गेली कित्येक वर्षे एकत्र आहे. प्रत्येकालाच स्वभावात थोडाफार बदल करावाच लागला. एकमेकांशी जुळवून घेणे बदलाशिवाय शक्यच नव्हते. तसेच पूर्वीच्या चुकीच्या प्रथा परंपरा आता बंद होत आल्या आहेत, हे देखील बदलाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

हे सर्व माझ्या मनात रुंजी घालत असतानाच माझ्या डोळ्यांसमोर आला तो निसर्ग. निसर्गात कितीतरी बदल होत असतात आणि प्रत्येक बदल निसर्गाकडून पटकन स्वीकारला देखील जातो. या विचारासरशी मला एकदम ताजेतवाने वाटू लागले. निसर्गासाठी बदलणे म्हणजे बहरणे. जुनी पाने गळून पडतात आणि झाडावर नवीन कोवळी पालवी येते. किती आनंदाने हा बदल स्वीकारला जातो निसर्गाकडून. अनेक रंगांची उधळण करत, नव्याचे स्वागत आनंदाने केले जाते. बदलाकडे पाहण्याची निसर्गाची सकारात्मक वृत्ती आपल्याला बरेच काही शिकवून जाते. बदलाचे, नवीन गोष्टीचे मनापासून स्वागत करण्याची नवी उमेद निसर्ग देतो. बदल म्हणजे नव्याची सुरुवात, बदल म्हणजे सर्वांना समजून घेणे, बदल म्हणजे विश्‍वास, बदल म्हणजे सकारात्मकता आणि बदल म्हणजेच आयुष्य. भविष्यात काहीतरी चांगले घडण्यासाठीच काही बदल होतात, हे मान्य केले तरच, बदल सहजरित्या स्वीकारला जातो. आणि म्हणूनच निसर्गाचे आनंदी जगण्याचे हे गुपित प्रत्येकाने आत्मसात करत जगावे आणि आयुष्यात प्रत्येक बदलाला आनंदाने सामोरे जावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by pooja samant