खरी ओळख

पूजा सामंत
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

अनेक व्यक्तींची ओळख आपल्याला त्यांच्या कामातूनच होत असते. कायम कार्यमग्न राहणे, हा त्यांचा स्थायिभाव असतो.

अनेक व्यक्तींची ओळख आपल्याला त्यांच्या कामातूनच होत असते. कायम कार्यमग्न राहणे, हा त्यांचा स्थायिभाव असतो.

आयुष्यात अनेकदा असा अनुभव येतो जेथे एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं नसतं, पण त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं बोलणं तुम्हाला प्रभावित करून जात. असाच एक मला आलेला अनुभव. काही कामानिमित्त फोनवर माझं त्यांच्याशी बोलणं झाल होतं. त्यांनी सांगितलेले अनुभव मला प्रचंड ऊर्जा देऊन गेले. आणि म्हणूनच मी त्यांच्या कामाची माहिती जमवायला सुरुवात केली. त्यांना शिक्षणाची अतोनात आवड, त्यामुळे लग्नानंतर देखील शिक्षणात खंड पडला नाही. शिक्षण पूर्ण करून शाळेत नोकरी सुरू झाली. त्याच दरम्यान मिठाईचा व्यवसाय देखील सुरू केला. वीस वर्षे मिठाईचे दुकान मिस्टरांबरोबर चालवले. सर्व प्रकारची मिठाई, फरसाण, मोतीचूर लाडू असे पदार्थ त्या आचाऱ्याच्या हाताखाली शिकल्या. जोडीला आपले महाराष्ट्रीयन खास दिवाळीचे पदार्थ मोदक, खव्याच्या, पुरणाच्या, सांज्याच्या आणि गुळाच्या पोळ्या होत्याच. दोन-तीन वर्षांत आचाऱ्याला काढून हे सर्व पदार्थ त्यांचे मिस्टर आणि त्या स्वतः बनवू लागल्या. साठीला मिस्टरांनी निवृत्ती जाहीर केल्यावर त्यांनी हा व्यवसाय घरी सुरू केला. दुकानात आणि घरी दहा-बारा महिला मदतीला होत्या. त्यातील सहा-सात जणींनी सर्व आत्मसात करून घेतले आणि आज त्या स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत. पण गणपतीला मोदक मात्र त्यांच्या हातचेच हवेत, असा आग्रह लोकांचा असल्याने मोदक मात्र त्या स्वतःच करतात. अशा प्रकारे अनेक महिलांना स्वतःच्या पायांवर उभे केल्यानंतर, समाजाची गरज आणि आवड म्हणून त्यांनी अंध शाळेत मुलांना शिकविणे सुरू केले. अकरावी ते एमए, एमपीएससी, यूपीएससी, तसेच कथा, कादंबरी आदींचे अंध मुलांसाठी रेकॉर्डिंग करणं, ब्रेल प्रिंटिंगसाठी पुस्तकांचे एडिटिंग करणं. हे सर्व गेली अनेक वर्षं सातत्याने, न थकता त्या आनंदाने करीत आहेत. त्यांचं वय साधारण सत्तर वर्षे, पण कामात उत्साह प्रचंड. आता तर त्यांना नात जावयाच्या फूड अॅन्ड फीट क्लाऊड किचनमध्ये सहभाग घेऊन सर्व शिकण्याची इच्छा आहे. तसेच त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी मिळून एक वाचनालय देखील सुरू केले आहे. त्यात साधारण साडेआठ हजार पुस्तकं उपलब्ध आहेत.

खरंतर त्यांची मुलं शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पण समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो असं म्हणून जगणारी ही आभाळाएवढी माणसं. अशा व्यक्तीचं काम पाहून आपलं आयुष्य देखील बदलून जात. आपल्यात देखील त्यांच्या प्रमाणे काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. महत्त्वाचं म्हणजे अशा या प्रेरणादायक व्यक्तींना जगासमोर आपलं नाव, आपलं काम यावं अशी पुसटशी इच्छा देखील नसते, फक्त या सर्वाचे श्रेय त्या लक्ष्मी रोडचे मोडी बोर्ड करता ‘फेमस’ असलेले, (कै) विठ्ठलराव पाटणकर व (कै) कमल विठ्ठल पाटणकर या त्यांना घडविणाऱ्या आई-वडिलांना देतात. आणि त्यांच्या कामातून झालेली त्यांची ही ओळख त्यांना पुरेशी आहे, असे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by pooja samant