नाचू आनंदे!

पूजा पराग सामंत
शुक्रवार, 6 मार्च 2020

एरवी चित्रपटगीतांच्या चालीवर थिरकणारी पावले अक्षरशः ‘गोंधळ’ घालताना पाहून आनंद झाला.

एरवी चित्रपटगीतांच्या चालीवर थिरकणारी पावले अक्षरशः ‘गोंधळ’ घालताना पाहून आनंद झाला.

माझ्या मुलीच्या शाळेत ‘आंतरशालेय नृत्य स्पर्धे’साठी तयारी सुरू झाली. एरवी स्नेहसंमेलनात बहुतेक नृत्ये पाश्चात्त्य पद्धतीची सादर होतात. बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांची फ्यूजन करून त्यावर समूहनृत्य हा तर सध्या विद्यार्थिप्रिय प्रकार. त्यामुळे नृत्यस्पर्धेसाठी असे फ्यूजन निवडले नाही, तेव्हा पहिल्यांदा विद्यार्थिनी गोंधळल्याच असाव्यात. आम्हा पालकांच्या मनातही धाकधूक. कारण, त्यांच्या नृत्य शिक्षकांनी गोंधळ आणि भारूड हा अस्सल मराठमोळा नृत्यप्रकार निवडला होता. त्यामुळे आपण काय नाचतोय, ते या मुलींना कळेल का? त्यांना नऊवारी साडी सांभाळता येईल का? असे प्रश्न आमच्या शंकाखोर मनाने स्वतःला विचारलेच. पण, शाळेत वेगळेच चित्र होते. त्यांचा सराव, गीताचे उच्चार, त्या बोलांचा अर्थ समजावून घेणे, असे सर्व जोमाने सुरू झाले होते. मुलींना गाणे नीट समजावून दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समजून नाचत असल्याचा सहजभाव होता. नृत्यासाठी लागणारी नऊवारी साडी, अस्सल महाराष्ट्रीय दागिने हौसेने आणले गेले. त्या दहा जणी आणि त्यांच्या नृत्य शिक्षकांच्या परिश्रमाने त्यांना पारितोषिकदेखील मिळाले.

मला वेगळेच समाधान मिळाले. गोंधळ-भारूड नृत्यप्रकार सादर करताना जो आनंद मिळाला तो अवर्णनीय होता, असे त्या दहा जणींचे मत होते. माझी मुलगी तर म्हणालीच, ‘‘आई, बॉलिवूडपेक्षा आम्हाला आता गोंधळ, भारूड असे अस्सल मराठी प्रकार आवडायला लागले आहेत.’’ माझ्या मुलीची ही प्रतिक्रिया मला सुखद धक्का देऊन गेली. इतर पाश्चिमात्य नृत्यप्रकार वाईट आहेत, असे मुळीच नाही. पण, आपल्या मराठीतील अनेक गोष्टी आजच्या पिढीला आवडत आहेत, हे मला लाखमोलाचे वाटते. मराठीतील अंगाईतून प्रत्येक आईचे मुलाविषयी प्रेमळ भाव दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा गाताना, ऐकताना महाराजांचा पराक्रम अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो. ती जादू माझ्या मुलीपर्यंत, तिच्या मैत्रिणींपर्यंत पोचली, याचा आनंद अधिक होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by pooja samant