स्थलांतर

muktapeeth
muktapeeth

स्थलांतर करताना केवळ देश सुटत नाही, तर भाषा, संस्कृती, मूल्य, विचारपद्धतीही मागे सुटते.

माझे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले नव्हते; पण माहेरहून पाऊल सासरच्या दिशेने टाकताना जसे डोळे भरून येतात, शंकीत, गोंधळलेल्या, घाबरलेल्या मनाने आपण नव्या घरात प्रवेश करतो, त्याच भावनेने मी चौतीस वर्षांपूर्वी भारताचे-माझ्या माहेरचे दार लोटून घेतले होते. मनात गोंधळ, भीती, कुशंका आणि जोडीला दोन लहान मुले. मन गोंधळलेले होते, तरीही खंबीर होते. त्याआधारे देशाचा उंबरठा ओलांडून कॅनडात येऊन पोचले. माझ्या नव्या घरी. नव्हे, नव्या सासरी. स्थलांतर नुसते देशाचेच नव्हे तर, विचारांचे, संस्कृतीचे, मूल्यांचे आणि माझ्या अस्तित्वाचे होते. नेहमी सलवार-कमीज किंवा साडी नेसणारी मी आता पँट, शर्टमध्ये वावरू लागले. फक्त समारंभाला, सणांना देशी कपडे घालू लागले. रोज वरणभात, चपाती-भाजीऐवजी आता सकाळी सोयीमुळे आणि मुलांच्या आवडीमुळे सकाळी सँडविचेस आणि संध्याकाळी आपल्या पद्धतीचा स्वयंपाक, तर कधी कधी पिझ्झा-बर्गरची फर्माइश. शाळेत जाणाऱ्या टीनएजर राधाला अतिआखूड स्कर्टमध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर चिडले आणि त्यानंतरच्या ‘मी शाळेतल्या बॅगेत लपवून नेऊ का इतर मुलींसारखे?’ या तिच्या वाक्याने गांगरूनच गेले. याला कसे उत्तर द्यायचे या बेचैनीने रात्रभर जागवून सोडले. आता तीच राधा तिच्या पाच वर्षांच्या मुलीच्या गमती-जमती सांगताना मला म्हणते, ‘‘मॉम, इट इज माय पे बॅक टाइम. तुला त्रास दिल्याबद्दल!’’ मुलगा शांत होता, पण ‘जेहोवा’ या कर्मठ विचारांच्या पंथात थोडे दिवस तो जात होता तेव्हा काळजी वाटे. तरी मी ‘ग्रोइंग अप प्रॉब्लेम्स’ म्हणत दीर्घ श्‍वास घेऊन मनाला शांत केले.

कामाच्या ठिकाणीही आपले शिक्षण, अनुभव पूर्णपणे स्वीकारला जात नाही. इथे पुन्हा आपल्याला व्यावसायिक परवाना घ्यावा लागतो, त्यामुळे आत्मविश्‍वास डगमगतो, पैशाची चणचण जाणवते आणि जे मिळेल ते काम घेऊन घर चालवावे लागते. ‘उद्या’ची भीती आणि उभे राहण्याची जिद्द, मदत करणारे मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबर कॅनडात चौतीस वर्षे कशी निघून गेली कळले नाही. माझी दोन पाखरे आणि आता दोन गोंडस नातवंडे, कॅनडीयन जावई, असे आमचे कुटुंब. आयुष्याची सफर कधी नरम, तर कधी गरम झोक्‍याप्रमाणे लहरत येते, त्यामध्ये आठवणींची सळसळ असते, कधी दुःखाच्या आठवणींचा झोंबरेपणा असतो, तर कधी सुखाची चाहूलही. अजूनही पुण्याला यायला आवडते.

मराठी पदार्थ आवडीने खाते. दिवाळी, गणपती साजरा करते. परदेशातीलही जे चांगले ते बघते, शिकते, ऐकते, आत्मसात करते. म्हणते, आता हाच आहे माझा संसार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com