स्टूल खरेदी

प्रभाकर पांडव
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

एक लाकडी स्टूल तयार करून हवा होता. कॅनॉल रस्त्यावर तो तयार करण्यासाठी टाकला. स्टूल तयार करून मिळेपर्यंत घडलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतील.

एक लाकडी स्टूल तयार करून हवा होता. कॅनॉल रस्त्यावर तो तयार करण्यासाठी टाकला. स्टूल तयार करून मिळेपर्यंत घडलेल्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतील.

एक छोटं लोखंडी स्टूल करायचं होतं. फर्निचरच्या दुकानात विचारलं तर 2400 रुपये पडतील म्हणाले. अर्थात सागवानी. आम्हाला साधं करायचं होतं. अचानक लक्षात आलं. कॅनॉल रस्त्यावर बाजूला लाकडी स्टूल पदपथावर मांडून ठेवलेली असतात.मला अपेक्षित असलेला स्टूल तिथे नव्हता. पण लगेच अर्ध्याएक तासात तयार करून देतो, असे कारागिराने सांगितले. पुढे 350 रुपये द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. मी घासाघीस करणारच होतो. तेवढ्यात त्याचं कुटुंब माझ्या दृष्टीस पडलं. सगळीकडं प्रचंड घाण. मी म्हणालो ठीकेय. तिथंच एका खुर्चीवर बसलो. कारागिराने स्टूल करायला घेतला. आता एखादा तास बसण्याची मनाची तयारी केली. समोर मोठा रस्ता. मित्रमंडळींकडे जाणारी व येणारी वाहनांची प्रचंड गर्दी बघत बसलो. मग लक्षात आलं, स्टुलाबरोबरच क्रिकेटच्या बॅट्‌स पण त्याने तयार केल्या होत्या. आकर्षक बॅट मांडून ठेवल्या होत्या. सहज किंमत विचारली. मुलाचं वय काय? मलाच प्रतिप्रश्‍न आला. वयानुसार किंमत होती. तेवढ्यात एक अग्निशामक दलाची गाडी येऊन थांबली. अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिस गाडीतून बाहेर आले आणि भराभर कॅनॉलच्या बाजूला गेले. रस्त्यावरचे पण काही जण त्यांच्या मागे धावले. स्टूल करत असलेला कारागीर पण काम थांबवून धावला. काय झालं हे कळेना. इतक्‍यात खोपट्यातून एक महिला बाहेर आली. मी तिला विचारलं काय झालं? ती म्हणाली, कॅनॉल मे एक डेड बॉडी बहके आयी है. ये हमेश्‍याकाचं है. थोड्या वेळात कारागीर परत आला व स्टूल तयार करू लागला. एकूणच प्रकार असह्य व्हायला लागला होता. क्षणभर वाटले आपण इथे उगाच थांबलो. काही फुटाच्या अंतरावर चौकाच्या पुढेच सारसबाग आहे. तिथेच जायला पाहिजे होतं. आता मनावर जे काय मळभ आले आहे, ते आले नसते. इतक्‍यात पोलिस व अग्निशामक दलाची मंडळी परत आली. स्टूलही तयार झाला होता. सांगितलेले पैसे देऊन मी स्टूल घेऊन रित्या मनाने घरी आलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by prabhakar pandav