esakal | आपुलकी
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

आपुलकी

sakal_logo
By
प्राची कर्वे

अशीही माणसे असतात आसपास, जी आपल्या बोलण्याने माणसे जोडत जातात, जी इतरांना हवीहवीशी वाटतात.

खरे सांगायचे तर याआधी मी बसने कधीच प्रवास केला नव्हता. पण काही कारणाने तो करण्याची संधी मिळाली. अनुभवाची शिदोरी वाढवायची असेल तर बसनेच प्रवास करावा. खूप दिवस मी कर्वे रस्त्यावरच्या नळस्टॉपपासून कोथरूडमधील गणंजय सोसायटीकडे जाण्याकरिता बसचा शोध घेत होते. चौकशी केल्यावर अशी बस आहे असे समजले. दुसऱ्या दिवशी ती बस आल्यावर कंडक्‍टरकाकांकडून ही बस त्या ठिकाणी जाते याची खात्री करून घेतली. बसमध्ये पाऊल टाकल्यावर कंडक्‍टरकाका म्हणाले, ‘‘या बसा.’’ मला तर आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. बस प्रवासात स्वागत होईल, असे वाटलेच नव्हते. माझ्याबरोबर बसथांब्यावर असलेल्या काकांनी कंडक्‍टरकाकांना मी कुठे उतरणार ते सांगितले. त्यावर कंडक्‍टरकाका म्हणाले, ‘‘बसा, बसा, थांबेल ही बस. काळजी करू नका.’’ मग मी नेहमी त्या बसनेच जाऊ लागले. प्रत्येक वेळी बसमध्ये चढल्यावर ‘या. आलात? बसा’ ऐकू येऊ लागले. खूप छान वाटू लागले. बससाठी थांबल्यावर काका नक्की भेटणार याची खात्री वाटू लागली. एक आपुलकीची भावना निर्माण झाली.

त्यांच्या या एका वाक्‍याने एकमेकांत संवाद होऊ लागला. काका सगळ्यांशीच असे बोलत. वयस्कर लोक, कॉलेजमधील मुले, नोकरदार सगळ्यांशीच ते छान बोलत. त्यांच्याबरोबरचे ड्रायव्हरकाकाही हसतमुख होते. तेही हसून विचारपूस करत. ड्रायव्हरकाकांना म्हटले की, ‘‘काका, उशीर झाला हो गाडीला.’’ तरी म्हणत ‘वेळेत पोचाल.’ चौक आला व खूपच ट्रॅफिक असले की म्हणत, ‘‘उतरा इथेच.’’ अन्‌ मी अगदी ऑफिसजवळच उतरायचे. पण नंतर काकांची ड्यूटी बदलली आणि आता काका दिसत नाहीत. खूप वेळा वाटते, खरेच, अशीही माणसे असतात की जी आपल्या बोलण्याने माणसे जोडत जातात. जी इतरांना हवीहवीशी वाटतात. अशा व्यक्ती भेटाव्याशा वाटतात. हा आपुलकीचा भाव मनाला इतका स्पर्श करून गेला, की लिहिण्याशिवाय राहवलेच नाही व आपल्यातही सुधारणा करावी असे वाटले. हा त्यातील महत्त्वाचा मनावर झालेला परिणामच होय.

loading image
go to top