ऑफलाइन मूड

प्रा. कीर्ती जाधव
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सगळी ऍप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे यापुढे खरे कसब ठरणार आहे. त्यासाठी ऑफलाइन मोडच्या मूडमध्ये जायला हवे.

सगळी ऍप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे यापुढे खरे कसब ठरणार आहे. त्यासाठी ऑफलाइन मोडच्या मूडमध्ये जायला हवे.

समाजमाध्यमावर एक संदेश वाचला. वीज गेल्यानंतर घरातले सगळे जवळ येतात. ‘कनेक्टिंग पीपल बाय डिसकनेक्टिंग पॉवर’ तंतोतंत पटलं. पूर्वीच्या काळी वीज नसायची. संध्याकाळी लवकर जेवणेखावणे उरकत. अंगणात लोक गप्पा मारत बसत. लवकर झोपल्यामुळे पहाटे जाग येणे आपोआप होई. आरोग्याचे नियम छान पाळले जात. वीज आल्यानंतर जीवनशैलीच बदलली. दूरचित्रवाणीवरच्या मालिकांच्या वेळापत्रकावर स्वयंपाकाची वेळ ठरू लागली. वाहतूक कोंडीमधून उशिरा परतणारी माणसे, उशिरा जेवण, मिळणारी अपुरी झोप यामुळे सारे जीवनचक्रच बदलले. आता इंटरनेटने माणसाचे जीवन ‘हॅक’ केले आहे. चांगले-वाईट अशा दोन्ही बाजू असणारी व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखी माध्यमे माणसाचा अमूल्य वेळ खर्च करत आहेत.
व्यसनाधीन झाल्यासारखा माणूस दर पाच-दहा मिनिटांनी आपला फोन तपासतो. मोबाईल स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे, मान यांना अतिरिक्त ताण पडत आहे. खरे तर आता सगळी अॅप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे खरे कसब ठरणार आहे. फोन बाजूला ठेवला तर आजूबाजूच्या अनेक चांगल्या गोष्टी दिसू लागतात आणि नवे विचार करायला मन प्रवृत्त होते. मात्र त्याकरिता दिवसातला काही काळ ऑफलाइन राहता येणे गरजेचे आहे. एखाद्याला समाजमाध्यमावर शुभेच्छा देण्यापेक्षा कधीतरी प्रत्यक्ष जाऊन भेटणे जास्त आनंददायी ठरू शकेल. अर्थात, बऱ्याचदा गप्पा मारता मारता फोन पाहणारे लोकही दिसतात. एखाद्याच्या हातात मोबाईल नसेल तर त्याला स्वतःलाच विचित्र वाटते. खरे तर ऑफलाइन राहून आपले जुने छंद नव्याने जोपासायला सुरवात करणे, एखादे जुने गाणे ऐकण्यात रममाण होणे हेही आवश्यक वाटू लागले. आजकाल चुकून कधीतरी वेळ मिळालाय आणि घरात आपण एकटेच आहोत तरीही ही गॅझेट्स आपला पिच्छा सोडत नाहीत. एखादी मस्त झोप काढावी असे वाटत नाही. सगळ्या कटकटी बाजूला ठेऊन दूर कुठेतरी फिरायला जावे तर फोटो काढणे आणि समाजमाध्यमावर अपलोड करणे हा मोठा सोहळा असतो. निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणे बाजूलाच राहते. खरे तर आठवड्यातून एक दिवस समाजमाध्यमापासून दूर राहणे हा उपवास करायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by prof kirti jadhav