घरातून काम करताना

muktapeeth
muktapeeth

घरातून काम करताना काही ‘हित’ साधले जात असतेही, पण त्या व्यक्तीला ‘गृहीत’ धरले जाण्याचीच शक्यता अधिक असते.

अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे कुठे ऑफिसात न जाता घरातून काम करणे इतकेच माहीत असते. त्यामुळे त्यांना ते खूपच सोपे वाटते. पण, घरून काम म्हटल्यावर रोजचा कंटाळवाणा प्रवास व वाहतुकीची चिंता नाही, इतकेच काय ते सुख. गेली बारा वर्षे मी घरातून काम करते. म्हणजे मी ‘२४ बाय ७’ घरात असते. घरातली कामे, दोन्ही मुलांच्या शाळा, अभ्यास, इतर वेळा सांभाळणे, वयस्कर सासू-सासऱ्यांची काळजी घेणे. कधी कोणी आजारी असेल तर घरात असल्यामुळे मला त्यांची काळजी घेणे सहज शक्य असते. हे सगळे करत असताना ऑफिसच्या वेळा आणि घरातली कामे यांचा ताळमेळ बांधताना चांगलीच तारांबळ उडते. काम ऑफिसमधून केले काय किंवा घरून केले काय; कामाचा ताण, लक्ष्य, मानसिक तणाव हा असतोच. शिवाय आठ तास सलग बसून पाठीचे, मानेचे त्रास सुरू होतात ते वेगळेच.

अजूनही खूप जणांना एक-दोन तास प्रवास केला की खऱ्या अर्थाने काम केले असा गैरसमज असतो. पण, घरातून काम करतानाचा ताण आणखी वेगळा असतो. म्हणजे ऑफिसच्या वेळेत कधी कोणी आले तर उठून चहा करणे, कधी मुलांना आणणे-सोडणे, कधी आजारी असतील तर डॉक्टरकडे घेऊन जाणे, अशा कामासाठी बॉसकडून परवानगी घेऊनच घरातल्या ऑफिसमधून बाहेर जावे लागते. इतरांना ऑफिस सुटल्यावर घरी येईपर्यंत तेथील ताणाचा थोडा तरी विसर पडतो. पण घरातल्या ऑफिसातील संगणक बंद केला की त्याक्षणीच आज काय भाजी करायची हा विचार मनात येतो. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या सणांना एकत्र येऊन आनंद घेतात, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा, पिकनिकची धमाल, मस्ती यांमुळे मन रोजच्या धावपळीतून थोडे ताजतवाने होते. पण, घरून काम करताना सणवार आले तरी घरचे सगळे सांभाळून परत ऑफिसचे काम हे त्या त्या वेळेला करावेच लागते. तरीही अष्टभुजेप्रमाणे गृहिणीही आठही हातांनी लढत असताना तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव कायम असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com