अग्गोऽबाई सासूबाई!

रागिणी कुलकर्णी
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सून म्हणून सासूबाईंकडून मिळालेले धडे स्वतः सासूबाई झाल्यावर उपयोगी पडतात, कुटुंब सांभाळताना.

सून म्हणून सासूबाईंकडून मिळालेले धडे स्वतः सासूबाई झाल्यावर उपयोगी पडतात, कुटुंब सांभाळताना.

सासूबाईंचा साधेपणा मला आवडायचा. सासूबाईंनी कधीही कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरला नाही किंवा अट्टहास केला नाही. अगदी देवपूजेचेही अवडंबर माजवले नाही. पूजेसाठी काही कमतरता असली तरी अक्षता ठेव म्हणायच्या आणि ‘भोळा भाव सिद्धीस जावो’, असे म्हणून मोकळे व्हायच्या. ‘चालढकल काम असावं गं. अट्टहास करू नये. त्यामुळे इतरांना त्रास होतो’, असे नेहमीच सांगायच्या. त्यांचा हा साधेपणा देवालाही नक्कीच आवडत असेल. आमच्याकडे उभ्या गौरी असतात. त्यामध्ये आम्ही सर्वांनी काळानुसार केलेले बदलही त्यांनी आनंदाने स्वीकारले. उलट त्या आमच्यापेक्षाही एक पाऊल पुढे होत्या. त्यांचे एकच म्हणणे असायचे, सगळ्यांची सोय बघून योग्य ते करा. त्यामुळे मला त्यांनी कधीच एखादी गोष्ट मनाविरुद्ध करण्यास भाग पाडले नाही किंवा कोणत्याही बाबतीत नापसंती दर्शविली नाही. त्यांची आयुष्याची गणिते खूप सोपी होती आणि त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने सोडवली. माझ्यासारख्या अचूकतेच्या मागे धावणारीला त्यांची ती गणिते कधी उमगलीच नाहीत, असे आता वाटते.

आयुष्याकडून, माणसांकडून, नातेवाइकांकडून त्यांच्या अपेक्षा फार नव्हत्याच. पण, सध्याच्या काळातील नात्यांमधला विसंवाद, तुटलेपण, दुरावा बघून मात्र त्यांना वाईट वाटायचे. तक्रार करणे, वाद घालणे या गोष्टी त्यांच्या स्वभावातच नव्हत्या. माझ्या धाकट्या मुलाचे लग्न ठरले आहे. आता मला खऱ्या अर्थाने सासूची भूमिका पार पाडायची आहे. त्यामुळे सासू बनण्याचे माझे प्रशिक्षण जोरात चालू आहे. मला तर असे वाटायला लागले, की खरेच सासू होणे इतके अवघड का आहे? आजच्या पिढीत व आपल्यामध्ये जे अंतर आहे ते पूर्वीपण असायचेच की! दोन पिढ्यांमध्ये अंतर तर कायमच राहणार आहे. माझ्याही कित्येक गोष्टी सासूबाईंना आवडल्या नसतील किंवा मलाही त्यांचा काही वेळेला राग आला असेल, पण तरीही आम्ही सासू-सुना एवढी वर्षे आनंदात राहिलोच ना! मग आता अडचण कसली? सासूबाईंनी आखून दिलेल्या मार्गावर जर मी माझी वाटचाल सुरू ठेवली, तर मी पण सुनेबरोबर मैत्रीपूर्ण नाते नक्कीच निर्माण करेन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by ragini kulkarni