समाजाचा हात

रजनी विलास बोपर्डीकर
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

उद्या (२८ सप्टेंबर) जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त या मुलांच्या शाळांमध्ये कार्यक्रम होतील. एका निवृत्त शिक्षिकेची आठवण.

उद्या (२८ सप्टेंबर) जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त या मुलांच्या शाळांमध्ये कार्यक्रम होतील. एका निवृत्त शिक्षिकेची आठवण.

गेल्या वर्षी सिडनीला मुलाकडे गेले होते. एकदा एका बागेत काही गोजिरवाणी मुले दिसली. लगेच लक्षात आले की, ही मूकबधिर आहेत व मी भूतकाळात गेले. कर्णबधिर मुलांच्या शाळेतून निवृत्त होऊन बारा वर्षे झाली, पण ‘हा़’ दिवस अजूनही लक्षात राहिला आहे व त्या दिवसाच्या आठवणीदेखील. आमच्या किशोर कुलकर्णीला एका नाटुकल्यात मावळ्याची भूमिका दिली होती. पण सांगूनही पठ्याने तलवार काही उपसली नाही. हट्टी, खोडकर, वरवर शांत दिसणारा. तो जन्माला आला तेव्हा सर्वसाधारण होता, पण लगेचच काविळीची शिकार झाला. त्यात चक्कर आली. प्रमस्तिष्क पक्षाघात झाला. तो मूकबधीर आहे हे पालकांच्या लक्षात आले होतेच, एक दिवस आईने आमच्या शाळेत त्याला दाखल केले. हळूहळू तो रमायला लागला. मुलांच्या थोड्या खोड्या, वह्या पुस्तके लपविणे चालू असायचे. नादिष्ट भारी. ‘कालनिर्णय’ तासनतास बघायचा. पुढे तारखांवरून वार ओळखणे, अमावस्या, पौर्णिमा सांगणे हे करू लागला. थोडा मोठा झाला तेव्हा मोबाईल, कॉम्प्युटर हाताळायला शिकला. पंचाहत्तर टक्के गुण मिळवून दहावी पास झाला. शाळा सुटल्यावर किशोरला पूजासाहित्याचे दुकान काढून दिले होते, पण तो रमला नाही. पण तो थोडा बिथरला होता, हट्टीपणा वाढला. अखेर त्याला एका केंद्रात ठेवायचे ठरले. तेथे तो छान रमला आहे.

आमचे बरेचसे मूकबधिर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. स्वतंत्र झाले आहेत. समाजात मिसळले आहेत. खूप समाधान होते त्यांचा शालेय प्रवास आठवून.
त्याहीपेक्षा समाधान वाटते, की काही संस्था विशेष मुलांना ‘आधार’ देतात, त्यांची देखभाल करतात. पालकांची काळजी दूर होते. आम्हालादेखील समाधान मिळते. कारण आमचे काही विदयार्थी ज्यांना शाळेचे शिक्षण संपल्यावर देखील आधार लागतो. समाजाचा हात या मुलांसाठी पुढे आहे हे पाहून काळजी मिटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by rajani bopardikar