मैदानातील भिडू

राजेंद्र माईणकर
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

अडतीस वर्षे खेळल्यानंतरही आम्ही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतके भांडतो. सच्चेपणाने खेळतो.

अडतीस वर्षे खेळल्यानंतरही आम्ही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतके भांडतो. सच्चेपणाने खेळतो.

‘स्नेहसेवा’ संस्थेत आमचे बास्केटबॉल सुरू झाले, तेव्हापासून बास्केटबॉलशी जोडली गेलेली नाळ आजतागायत अबाधित आहे. आधी साठे कॉलनी, मग गरवारे कॉलेज, नंतर पीवायसी जिमखाना आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्र मंडळ, मुकुंदनगर येथे आम्ही जमतो. संसार व नोकरीचा व्याप सुरू होण्यापूर्वी दररोज संध्याकाळी भेटत होतो. सध्या फक्त शनिवार-रविवारी सकाळी भेटतो. तुम्हाला सांगतो, आठवड्याचे पाच दिवस आमच्यापैकी प्रत्येकाला शनिवार-रविवारची प्रचंड उत्कंठा असते. कधी एकदा ग्राउंडवर पोहोचतो आणि गेम सुरू करतो, अशी बालसुलभ उत्सुकता असते. आठवतेय, पूर्वी पहाटे पाच-साडेपाचच्या चांदण्या अंधारात आम्ही पीवायसी जिमखान्यावर पोहोचत असू. तिथली चहाची टपरीही आम्ही आल्यानंतर उघडली जायची. रस्त्यावर पहिल्या चहाच्या पहिल्या कपाचा सडा पडल्यावर आमच्याकडून टपरीवाल्याची बोहोनी व्हायची. त्यानंतर सूर्य कासराभर वर येईपर्यंत (पूर्वी डेक्कनवर तसे चक्क दिसायचे!) घामाने निथळत उधळत आमचा गेम होत असे.

कालौघात शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, मुले-बाळे, त्यांचे शिक्षण असे करतानाही बास्केटबॉलबाबतीतील झपाटलेपण ठाण मांडून बसले आहे. किंबहुना, वयपरत्वे त्यातला ताजेपणा वाढतच चाललाय. खेळताना आजही हमरीतुमरीवर येऊन अबोला धरण्याइतपत आमची भांडणे होतात. आमचा खेळ बाहेरून पाहणाऱ्याला हे सर्व फार बालिश वाटत असेल; पण बास्केटबॉल कोर्टवर आमच्या सर्वांच्या भावना ह्या एकाच पातळीवर बांधलेल्या असतात. चेंडूवरचे नियंत्रण आणि ती बास्केट टाकण्याची लढाऊ वृत्ती ह्या सर्वांचे सूर जुळतात, तेव्हा फेक, बचाव, आक्रमण यात नव्वद मिनिटांचा गेम सार्थकी लागतो. अडतीस वर्षे सातत्याने खेळूनही गेम संपल्यावर एकमेकांना उपदेशाचे डोस पाजले जातात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दाखले दिले जातात. खेळ संपल्यावर हॉटेलमध्ये होणारा नाश्‍ता आणि गप्पांची बैठक म्हणजे आमच्या ह्या मैफलीची भैरवी असते. तिथे जगातला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. शेवटी पुढच्या रविवारी ‘जरा लवकर गेम सुरू करू’ ह्या बोलीवर निरोप घेतो. कोर्टवर खेळताना चार-पाच तास हे सर्वस्वी आमचे असतात. मोकळेपण म्हणजे पुढच्या पाच दिवसांच्या टॉनिकची बेगमी असते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by rajendra maienkar