यमुनोत्रीचा सूर्यास्त

muktapeeth
muktapeeth

आपल्याकडे सूर्यास्तानंतरही तास-दीड तास मंदावणारा उजेड असतो. पण, यमुनोत्रीचा अनुभवच वेगळा. या सूर्यास्तानंतरचा प्रवास कायमचा स्मरणात राहील.

यमुनोत्रीला निघालो होतो. एकीकडे उत्तुंग हिमालय तर, दुसरीकडे खोल दरी. एकेक पाऊल काठीच्या आधारे सांभाळून टाकीत होतो. कच्ची वाट, चिखल, घोड्याची लीद, भरीला उभी चढण असल्याने चालताना दमछाक होत होती. दगड-धोंड्यांच्या वाटेवरून, पाऊलभर पाण्यांतून गेलो. पाईनची वनश्री, हिमालयाचे विविधरूपी दर्शन, सुंदर निसर्ग आमचा शीण घालवत होते. पालखीवाल्यांना, घोडेवाल्यांना वाट करून देताना पर्वताला पाठ टेकूनच उभे राहावे लागे, एवढी ती वाट अरुंद. सकाळी निघताना थंडी, दुपारी पाऊस आणि अधूनमधून छान ऊन असे सर्व ऋतू तेथे एका दिवसात अनुभवले. सुमारे आठ किलोमीटरचा प्रवास साडेसहा तासांमध्ये पूर्ण केला होता. शेवटी एकदाचे मंदिर दिसल्याने आम्ही हुश्‍श केले. गरम कुंडातील पाण्याने जेमतेम हातपाय धुतले व अंगावर शाल घेत मंदिरात गेलो. शिळेखालून उगम पावलेली यमुना पाहून मन प्रसन्न झाले. मंदिरातील काळ्या पाषाणातील यमुना, संगमरवरी गंगेची मूर्ती आणि मधली श्रीमहालक्ष्मी पाहून थकवा पळून गेला होता.

तिथे थांबायची सोय नसल्याने अंधार व्हायच्या आधी मुक्कामाला पोचणे भाग होते. काठी टेकत सावकाश उतरावे लागे. कारण उतार होता. चुकून पाय घसरला तर.. खोल दरी होती. आता हळूहळू सूर्यास्ताची लक्षणे दिसू लागली होती. शेवटी सूर्यास्त झाला आणि क्षणार्धात गुडूप अंधार. सूर्यास्तानंतर थोडा कमी होत गेलेला उजेड आपल्याला खाली उतरायला पुरेसा होईल, असे वाटले होते. पण, इथे सूर्यास्त होताक्षणीच गडद अंधार. पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवलेली बॅटरीपण सापडली नव्हती. गडद अंधारात पुढची वाटही न दिसल्याने हळूहळू चाचपडत, एकमेकांच्या आधाराने पावले टाकीत उतरलो. अचानक झालेल्या अंधाराची पुसटशीही कल्पना नसल्याने भयानक परिस्थितीतून मार्ग काढीत होतो. अगदी डोळे फाडून, अंधारातून असे सुमारे दोन किलोमीटर पायी गेलो आणि माणसांची चाहूल लागल्याबरोबर जिवात जीव आला. टूर लीडर, सहप्रवासी आमची काळजी करीत, वाटच पाहत होते. ते शोधायला निघणार इतक्‍यात आम्ही पोचलो होतो. यमुनोत्रीच्या सूर्यास्तानंतरचा काळाकुट्ट, भयानक अंधार आमच्या चिरआठवणीत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com