लढवय्या सोबती

रोहिणी मेहेंदळे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पायदळातील अधिकाऱ्याचा सहायक आपल्या स्वभावाने सारे घरदारच जिंकत असतो.

पायदळातील अधिकाऱ्याचा सहायक आपल्या स्वभावाने सारे घरदारच जिंकत असतो.

पायदळातील अधिकारी सेवेत असताना त्याच्या बरोबर त्याचा सहायक असतो. सरहद्दीवर असो, लढाईच्या ठिकाणी किंवा कुटुंबाबरोबर असो, त्याचा सहायक नेहमी त्याच्या दिमतीला असतो. कर्नल प्रदीप हे गुरखा व आसाम रेजिमेंटचे असल्यामुळे त्यांचा सहाय्क हा नेपाळी किंवा आसामकडचाच असे. हे लोक मनाने खूप प्रेमळ, साधे व जीव लावणारे असतात. आम्ही स्त्रिया सहायकाला बहादूर किंवा भैया असेच संबोधित असू. प्रदीपने एकदा एक पत्र पोस्टात टाकायला बहादूरकडे दिले. पत्र लवकर टाकून त्याने यावे म्हणून स्वतःची सायकल घेऊन जायला सांगितले. पत्र टाकायला गेलेला बहादूर लवकर परत आला नाही. त्याला तुलनेने बराच उशीर झाला. त्याला विचारले तर म्हणाला, ‘‘मी एकटाच पळत गेलो असतो तर लवकर आलो असतो, पण साहेबांनी मला सायकल घेऊन जायला सांगितल्यामुळे उशीर झाला.’’ त्याला सायकल चालवता येत नाही हे कसे सांगणार? त्याला आज्ञा पाळायचेच माहीत. तो हातात सायकल घेऊन गेला आणि आला.

काश्‍मीरला असताना माझे स्वयंपाकघर छोटे होते. तिथे रोज एक उंदीर येत असे. माझ्या स्वयंपाकाच्या वेळी बहादूर तिथे कधीच नसे. एक दिवस उंदीर दिसला आणि नेमका बहादूरही होता. त्याला गॅसच्या शेगडीजवळ उंदीर दिसला. त्याने दोन्ही बाजूने हात घालून पटकन उंदराला पकडले व स्वतःच्या खिशात घातले. मला वाटले की त्याच्या हातून तो निसटला, पण बहादूर खिशातून उंदीर काढून दाखवत म्हणाला, ‘‘यह तो छोटे जात का चूहा है। उम्र से बडा है। इसकी मुंछे भी निकली है ।’’ त्याचे वाक्‍य ऐकून खूप हसू आले. हे आदिवासी लोक कुठलाही प्राणी सहजपणे पकडतात. मोठी गंमत वाटली.

आमचा हा लढवय्या सोबती त्याच्या साध्या, सरळ स्वभावाने सर्वांना आपलेसे करतो व सकारात्मक ऊर्जा देतो. त्याला मनापासून धन्यवाद!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by rohini mehendale