सूर्य नभीचा ढळता...

सचिन महाजन
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

त्या सगळ्याच खंबीर व्यक्तींची जीवनऊर्जा अतिशय जबरदस्त होती. पण, त्यांनी कर्त्या दिवसांत माणसे दुखावली, त्यामुळे निवृत्तीनंतर ती एकटी पडली.

त्या सगळ्याच खंबीर व्यक्तींची जीवनऊर्जा अतिशय जबरदस्त होती. पण, त्यांनी कर्त्या दिवसांत माणसे दुखावली, त्यामुळे निवृत्तीनंतर ती एकटी पडली.

ते ‘नेव्ही’मध्ये उच्चपदस्थ होते. त्यांना न्यायला अतिशय चकाकणारी काळ्या रंगाची शोफर ड्रीवन अँबेसेडर यायची. त्यांचा दराराही खूप होता. आम्ही त्यांच्यापुढे जायला चळाचळा कापायचो. दुसरे एक जण रेल्वेत उच्च पदावर होते. त्यांचे वागणे असे होते, की जशी रेल्वे त्यांच्यामुळेच सुरळीत चालतेय. प्रचंड संतापी स्वभाव. कोणतीही कठीण परिस्थिती न डगमगता त्यांनी अतिशय लीलया हाताळलेली आम्ही जवळून पाहिली आहे. आणखी एक परिचित एका सरकारी खात्यात उच्च पदावर होते. अतिशय झपाट्याने निर्णय घ्यायचे. आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या धडाडीने दडपून जायला व्हायचे. अशा अनेक प्रचंड कार्यक्षम माणसांना मी अगदी जवळून पाहिले. हेही पाहिले, की त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक त्यांच्या फटकळ बोलण्याने आणि त्यांच्या स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या सवयीने मनाने दूर होत गेलीत. परंतु, अतिशय जवळच्यांनी प्रेमाखातर किंवा सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना अतिशय खंबीर साथ दिली.

मात्र, हीच माणसे निवृत्त झाली, तेव्हा त्यांचे पद, रुबाब गेला. आजूबाजूला सतत शब्द झेलणारे नसल्याने आणि दिवसभर घरीच राहिल्याने प्रथम मनाने आणि मग शरीराने कमकुवत होत गेली. त्यांना वयपरत्वे दमा, हृदयविकार, संधिवात, स्मृतिभ्रंश अशा गंभीर व्याधींनी, नैराश्याने ग्रासले आणि आज त्यांचा सारा दरारा लोपला. तेज मावळले. अझीझ नाझा यांची प्रसिद्ध कव्वाली डोळे खाडकन उघडणारी आहे :
हुए नामावर बे निशान कैसे कैसे
जमीन खा गयी, नौ जवां कैसे कैसे
चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा

ही जाणीव कायम ठेवून आतापासूनच खऱ्या विश्वातील माणसे जोडणे आवश्यक आहे. जरा आपला अहंकार बाजूला ठेवून जास्तीत जास्त जनसंपर्क वाढविणे, कोणत्या तरी संस्थेबरोबर काहीतरी सामाजिक कार्याला स्वतःला जोडून घेणे हे आतापासूनच करायची गरज आहे. म्हणजे सूर्य बुडता बुडता सांजप्रवाहीही आपला प्रवास सुखकर होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sachin mahajan