सत्त्वपरीक्षा

संपतराव शितोळे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

महाविद्यालयीन जीवनात उत्तम ॲथलेट बनू शकलो, पण त्याची पायाभरणी शालेय वयात झाली होती.

महाविद्यालयीन जीवनात उत्तम ॲथलेट बनू शकलो, पण त्याची पायाभरणी शालेय वयात झाली होती.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती परीक्षा देण्याची वेळ येत असते. मग ती शाळेच्या परीक्षेची, शाळा प्रवेशाची, निरनिराळ्या नोकऱ्यांसाठी परीक्षा व आता वधूवर परीक्षा. माझ्या आयुष्यामध्ये पण वेगवेगळ्या परीक्षा देण्याचा योग आला. आमच्या वेळी व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे आत्ताची इयत्ता सातवीची परीक्षा लोकल बोर्डातर्फे घेतली जात होती. ग्रामीण भागात तालुक्‍याच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जात होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा नोकऱ्या मिळत असत. परंतु, वयाची अट असे. त्या वेळी मौजे शिवणे (हवेली) येथे मी इयत्ता सातवीमध्ये होतो. पुण्यात व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा देण्यासाठी आलो. आमच्या वर्गातील पंधरा मुले व शिक्षक बाजीराव रस्त्यावर असणाऱ्या नवा विष्णू मंदिर या ठिकाणी मुक्कामी होतो. परीक्षा केंद्र पुणे मनपा शाळेमध्ये होते. परीक्षेच्या ठिकाणी पायी जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येत असे. चार दिवस परीक्षा संपल्यानंतर आम्ही सर्वांनी विजय थिएटरमध्ये ‘सुवासिनी’ हा चित्रपट पाहिला. पुण्यामध्ये हा मी पाहिलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर स्वारगेटवरून एसटीने सर्व जण घरी परत आलो.

या परीक्षेसाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली होती. रात्री आमचा मुक्काम शाळेतच असे. अंथरूण व पांघरूण शाळेतच ठेवत असू. रॉकेलच्या चिमण्याच्या उजेडात अभ्यास करत असू. पहाटे चार वाजता उठून अभ्यास करावा लागत असे. त्यानंतर परत घरी जाऊन अकरा वाजता शाळेत यावे लागत असे. त्यामुळे रोजचा पायी प्रवास पंधरा किलोमीटर असायचा. लहान वयात एवढे कष्ट करून आम्ही ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यामुळे माझ्या आयुष्याला कष्ट करण्याची सवय लागली. तसेच शारीरिक क्षमता वाढली. कारण रोज पायी प्रवास. त्या वेळी सायकल खूप कमी होत्या. पुढे हायस्कूल व कॉलेज जीवनामध्ये एक उत्तम ॲथलेट बनू शकलो. खरोखर ही सत्त्वपरीक्षा कोणत्याही परीक्षेपेक्षा खूपच मोठी होती, असे मी मानतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sampatrao shitole