पाचगणी ते लंडन... ‘शो मस्ट गो ऑन’

muktapeeth
muktapeeth

संगीत हा अनादिकाळापासून मानवी जीवनाशी निगडित अविभाज्य घटक आहे. असे कधीच होणार नाही की, माणसाला शांती आणि सौंदर्याचा तिरस्कार वाटेल, तद्वतच असे कधीच होणार नाही की माणूस संगिताचाही तिरस्कार करेल. भारताला संगिताचा विपूल वारसा लाभलेला आहे. हा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले.

भारतीय संगिताचे अनेक प्रकार आहेत. भारतीय शास्त्रीय गायन हे ध्वनीप्रधान आहे. शास्त्रीय संगितात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी असे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. भारतीय संगीत हे प्राचीन काळापासून विकसित होत आले आहे आणि कालानुरुप ते विकसित होतच आहे. परंतु त्याच भारतीय संगिताने पाश्‍चात्य देशातील एक महान गायक बनविण्याचे काम केले. तो जरी हयात नसला तरी त्याच्या गाण्याचे आणि संगिताचे गारुड अजूनही समाजमनावर आहे. अभिमानाची बाब म्हणजे भारतासह जगाला नररत्न देण्याचे काम करणार्‍या सातारच्या भूमिमधून असाच एक फिनिक्स राखेतून उडाला आणि साहेबांच्या देशात म्हणजेच ब्रिटनमध्ये जावून विसावला. तो म्हणजे फारुख बलसारा उर्फ फ्रेडी मर्क्युरी.

इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या आसपास इराण देशावर मुसलमानांनी आक्रमण केले. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तत्कालीन पारशी झोराष्ट्रीय समाजाने सोन्याचा धूर निघणार्‍या भारताकडे आश्रयासाठी पलायन केले. गेली अनेक वर्षे हा समाज भारतात राहत आहे. गुजरातच्या बंदरावर हा समाज बोटीतून उतरल्यानंतर तत्कालीन गुजरातच्या राजाने या लोकांना पकडून राजदरबारात आणले. भाषेची अडचण असल्यामुळे संवाद होत नव्हता. परंतु, त्यातील एका पारशी माणसाने घंघाळात दूध ओतून त्या दुधामध्ये मध टाकला आणि ते राजाला प्यायला दिले. यानंतर खुणेनेच सांगितले की, याच्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्यानंतर त्या राजाने इराणमधून आलेल्या त्या लोकांना आधार दिला. अशा प्रकारची आख्यायिका यासंदर्भात सांगितली जाते. भारतामध्ये सर जमशेदजी टाटा यांनी औद्योगिकतेचा पाया रचून इतिहास निर्माण केला. त्याचबरोबर गोदरेज, वाडिया या कुटूंबांनीही भारतीय अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था देण्याचे काम केले आहे. भारतीय अणुसंशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जे भाभा, भारत-पाकिस्तान लढाईत अतुल्य शौर्य गाजवून भारताला विजय मिळवून देणारे तत्कालीन फिल्ड मार्शल सॅम माणिकशॉ, दादाभाई नौरोजी, अर्देशीर इराणी, नरिमन कॉण्ट्रॅक्टर, संगीतकार झुबीन मेहता, नानी पालखीवाला, सोली सोराबजी, अॅडगुरू सॅम बलसारा अशी कितीतरी नावं सांगता येतील, ज्यांनी भारताच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे. कितीतरी लोक भारतीय पारशी समाजातून पुढे आली. त्यांनी समाजोत्थानाचे काम केले. अशाच भारतीय पारशी समाजातून एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी जन्माला आली. ती म्हणजे फारुख बलसारा उर्फ फ्रेडी मर्क्युरी.

70-80 च्या दशकात पाश्‍चात्य विश्‍वामध्ये फ्रेडी मर्क्युरी आणि क्विन्स बॅण्डने इंग्लंड-युरोपसह अमेरिकेतही धुमाकूळ घातला होता. आपल्या उत्तमोत्तम गाण्यांच्या आणि संगिताच्या जोरावर त्याने अबालवृद्धांना वेड लावले होते. तत्कालीन इंग्लिश गायक फ्रेडी मर्क्युरीच्या आसपासही फिरकत नव्हते. एवढी लोकप्रियता फ्रेडी मर्क्युरी आणि त्याच्या बॅण्ड ने मिळवली होती. शतकातील उत्तम गायक कोण तर तो फ्रेडी मर्क्युरीच असावा याबाबत कोणाचेच दुमत नसावे. आज फ्रेडीचे निधन होऊन उणेपुरे 29 वर्षे उलटलीत, परंतु फ्रेडी मर्क्युरीच्या गाण्यांचे गारुड आजही समाजमनावर आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही. पाचगणीतल्या सेंट पिटर्स या शाळेत फ्रेडी म्हणजेच फारुख बलसाराने 8 वर्षे शिक्षणासाठी काढली. एल्विस प्रिसलेच्या गाण्यावर छोट्या फारुखची नाजुक बोटे जेव्हा पियानोवर हळूवारपणे फिरत असायची त्यावेळी पाचगणीतील दर्‍याखोर्‍यातील गवतांनाही धुमारे फुटायचे. फ्रेडी उर्फ फारुख बलसाराचा जन्म ब्रिटीश वसाहत असलेल्या मध्य आफ्रिकेतील टांझानियातील झांझीबारमधील स्टोन टाऊन या शहरात 5 सप्टेंबर 1946 रोजी झाला. त्याचे वडील बोमी बलसारा हे मूळचे गुजरातमधील वलसाड येथील. परंतु ब्रिटीश वसाहतीमधील कार्यालयात ते रोखपाल म्हणून नोकरीस होते. आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे, त्याला माझ्यासारखीच चांगली नोकरी मिळावी अथवा तो चांगला मुष्टीयोद्धा व्हावा, असे सामान्य पालकांप्रमाणेच स्वप्न बोमी बलसारा यांनी पाहिले होते. त्याचसाठी त्यांनी त्याच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी इतर पारशी पालकांप्रमाणेच छोट्या फारुखला वयाच्या सातव्या वर्षीच सातारा जिल्ह्यातील पाचगणी या गिरीस्थान शहरामधील सेंट पिटर्स या शाळेत शिक्षणासाठी दाखल केले.

सेंट पिटर्स ही तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील नावाजलेली शाळा. 1861 सालची स्थापना असलेल्या या शाळेत अनेक महानुभवांनी आपले शिक्षण घेतलेले आहे. आज या शाळेला आज 158 वर्षे झाली आहेत. ब्रिटीश अधिकारी मिस्टर जे चेसन यांनी या शाळेची स्थापना केली. याच शाळेत फारुख उर्फ फ्रेडी मर्क्युरीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याचा फ्रेडी मर्क्युरीनेही वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. सुमारे आठ वर्षे फारुख उर्फ फ्रेडी मर्क्युरीने सेंट पिटर्समध्ये अध्ययन केल्यानंतर त्याला संगिताची गोडी लागली. सेंट पिटर्समधील संगिताच्या शिक्षकांनी पियानोसह पाश्‍चिमात्य तंतूवाद्यांमध्ये फारुखला नैपुण्य येण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कदाचित या परिश्रमामुळेच फ्रेडीने पाश्‍चिमात्य संगितामध्ये आपले अढळ स्थान प्रस्थापित केले. आजही फ्रेडी मर्क्युरीचे काही सहअध्यायी भारतामध्ये आहेत. वेळोवेळी त्यांनी टीव्ही आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून फ्रेडी मर्क्युरीच्या शाळेतील दिवसाच्या आठवणी मांडलेल्या आहेत. पाचगणी ते महाबळेश्‍वर हा सायकलवरील वीस किलोमीटरचा प्रवास असो अथवा महाबळेश्‍वरमधील वेण्णा लेकमधील नौकाविहार असो. फ्रेडी मर्क्युरीच्या त्या बाललीलांचे ठसे आजही माल्कम पेठेत अर्थात महाबळेश्‍वर पाचगणीच्या मातीत उठलेले आहेत. आपल्याकडे चिकित्सक वृत्तीचा अभाव असल्यामुळेच फ्रेडी मर्क्युरीसारखा एक महान गायक या मातीतून तयार झाला. याची कल्पना फारच कमी लोकांना आहे. असो, पाचगणीमध्ये शिकत असतानाच फारुख आणि त्याच्या सहकार्‍यांनी द हेक्टिक्स आणि कव्हर्ड रॉक ऍण्ड रोल सारखे बॅण्डही काढले होते. याच्या खुणाही सेंट पिटर्समध्ये आपल्याला निश्‍चितच पहायला मिळतील. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत फारुख उर्फ फ्रेडी पाचगणीमधील सेंट पिटर्समध्ये शिकला. त्यानंतर टांझानियात ब्रिटीश वसाहतीविरोधात बंड झाल्यानंतर बलसारा कुटूंब पुन्हा इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे पाचगणीतील सेंट पिटर्समधील शिक्षण अर्धवट सोडून फारुख उर्फ फ्रेडीलाही इंग्लंडमधील मिडलसेक्समध्ये जावे लागले. त्यानंतर त्याने एल्सओर्थ पॉलिटेक्निक कॉलेज व एलिंग आर्ट कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी फ्रेडीने लंडनमधील हिथ्रो विमानतळावर ग्राऊंडमनची नोकरी केली. तसेच लंडनमधील गल्लीबोळात कपडेही विकले. परंतु अंगभूत असलेले संगिताचे वेड त्याला गप्प बसू देत नव्हते. जन्मत:च तोंडातील विशिष्ट रचनेमुळे स्वरयंत्राची देणगी लाभलेल्या फ्रेडीने एक संधी मिळावी यासाठी ब्रिटनमधील अनेक बॅण्ड पालथे घातले. शेवटी 1969 साली फ्रेडीला ब्रेक मिळाला. लिव्हरपूलमधील बॅण्ड आयबॅक्स-रिकेज या बॅण्डमधून फ्रेडीने आपल्या करिअरला सुरुवात केली. वेगवेगळ्या क्लबमध्ये फ्रेडी आणि त्याच्या सहकार्‍यांचा बॅण्ड धुमाकूळ घालत होता. एप्रिल 1970 मध्ये गिटारिस्ट ब्रायन मे आणि ड्रमर रॉजर टेलर यांनी एकत्र येवून 'स्माईल' नावाच्या बॅण्डची स्थापना केली. दिवसेंदिवस फारुख उर्फ फ्रेडी मर्क्युरीची लोकप्रियता इंग्लंडमध्ये विशेषत: लंडनमध्ये वाढत होती. परंतु फारुख बलसारा हे भारतीय धाटणीचे वाटणारे नाव अडचणीचे ठरत होते. फारुख म्हणजे पाकिस्तानी, असा समजही अनेकांचा झाला होता. त्यामुळे आपल्या करिअरवर त्याचा विपरित परिणाम होईल, या भीतीने फारुख आणि त्याच्या सहकार्‍यांनी अखेर फारुख पासून फ्रेडी मर्क्युरी असे नामकरण केले. दिवसेंदिवस फ्रेडी मर्क्युरी आणि त्याच्या बॅण्डची लोकप्रियता वाढत होती. त्यांची अनेक नवनवीन गाणी लोकप्रिय होत होती. याची दखल घेवून इंग्लंडमधील अनेक संगित कंपन्या त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकू लागल्या. शेवटी ब्रिटनच्या राणीच्या नावापासून प्रेरणा घेत त्यांनी 'क्विन्स' नावाच्या बॅण्डची स्थापना केली. शेवटपर्यंत हेच बॅण्ड नेम त्यांनी शेवटपर्यंत वापरले. त्यानंतर या बॅण्डने कधीही मागे वळून बघितले नाही.

फ्रेडी मर्क्युरीचे समकालीन गायक डेव्हिड बॉवी, जॉर्ज मायकल, जॉन लिनन, मायकेल जॅक्सन, ब्रायन ऍडम्स, लियोनो रिची या गायकांमध्ये फ्रेडी मर्क्युरीने आपला आवाज व आपल्या हटके स्टाईलने आपली वेगळी इमेज निर्माण करण्यात यश मिळवले होते. गेल्या वर्षी फ्रेडी मर्क्युरीच्या जीवनावर 'बोहेमियन रॅपसोडी' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. फ्रेडी मर्क्युरीच्या जीवनावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला. मात्र त्याचे बालपण व शालेय जीवनाविषयी या चित्रपटामध्ये खास असे काही नव्हते. साहजिकच त्यामुळे तसा हा चित्रपट अपूर्णच म्हणावा लागेल. फ्रेडी मर्क्युरी आणी त्याच्या बँण्डने मानाचे अनेक पुरस्कार पटकाविले. त्याच्या समकालीन गायकाच्या तुलनेत फ्रेडी मर्क्युरी निश्चितच उजवा होता. परंतु करिअर ऐन भरात असताना त्याला एचआयव्ही एड्ससारख्या भयानक रोगाची लागण झाली. या जीवघेण्या आजाराशी लढत तो जगभर आपले कॉन्सर्टचे कार्यक्रम घेतच होता. परंतु शेवटी मृत्यूने त्यालाही गाठलेच. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी म्हणजेच २४ नोव्हेंबर १९९१ रोजी एड्समुळे त्याचा मृत्यू झाला. १९९२ ला क्विन्स बँण्डमधील त्याच्या सहकाऱ्यांनी फ्रेडी मर्क्युरीच्या स्मरणार्थ त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी मर्क्युरी फिनिक्स ट्रस्टची स्थापना केली. जगभरातील एड्सबाधित लोकांसाठी तसेच एड्सच्या निर्मुलनासाठी ही संस्था आजतागायत काम करीत आहे. पाचगणीच्या सेंट पिटर्समध्ये सुमारे आठ वर्ष शिक्षण घेणारा संगीताचा पाया याच शाळेत मजबूत करणारा फारुख बलसारा उर्फ फ्रेडी मर्क्युरी जागतिक संगीत क्षेत्रामध्ये आपले स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ करतो, ही खरंच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. साताऱ्याच्या मातीतून उडालेला हा फिनिक्स नवेनवे उच्चांक प्रस्थापित करतो, ही खरेतर सातारकरांसाठी स्वप्नवत गोष्ट आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्याचा २८ वा स्मृतीदिन. निश्चितच त्याच्या स्मृतीदिनादिवशी सेंटर पिटर्स शाळेतील भिंतीलाही पाझर फुटत असावा. आपल्या दर्जेदार गाण्यांच्या आणि संगीताच्या जोरावर ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या मातीने घडविलेल्या सुपुत्राला त्याच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
- संग्राम निकाळजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com