तगर

शुभदा सप्रे
बुधवार, 31 जुलै 2019

गंध-रंगांची फुले नसली की देव सजवायला तगरीची फुले उपयोगी येतात. एरवी उपेक्षाच होते त्यांची.

गंध-रंगांची फुले नसली की देव सजवायला तगरीची फुले उपयोगी येतात. एरवी उपेक्षाच होते त्यांची.

हे दिवस असे असतात, की मोगऱ्याचा बहर संपलेला व पारिजातक अजून बहरात यायचा असतो. पण देवांसाठी तगर बहरलेली. तगर बाराही महिने बहरलेली. त्या तगरीने आजकाल देव सजतात. लाल जास्वंदांच्या मध्ये इतके सुंदर रूप दिसते देवघराचे. वर्षभर फुलणाऱ्या तगरीचा स्वच्छ धवल रंग वैराग्याचा. भरपूर पाकळ्या असलेले तगरीचे फूल लांबून एकदम पांढरे गुलाबाचे फूल वाटते. दुसरे एकेरी पाकळ्यांचे. चांदणीसारखे रात्रीच्या अंधारात ते फारच चमकते. चांदणीसारख्या पाचच पाकळ्या. दोन्ही प्रकारच्या तगरी भरपूर फुलतात. त्याला ना गंध, ना रंग. त्यामुळे तगरीची थोडी उपेक्षाच होते का? पण इतर फुले नसली की त्यानेच देव सजवतात. बाकीच्या वेळेला आयुष्य संपले की गळून पडतात. बिनबोभाट. आपल्याला देवपूजेत अग्रहक्काचा मान नाही म्हणून त्याला खंत नाही. बरे, ती कवींचीही आवडती नाही. माझ्या वाचनात कवी ह. स. गोखले (आठवणीतल्या कविता - भाग 3) यांची तेवढी एकच कविता आली. कवी म्हणतात, "फूल तगरीचे सर्व गुणी साधे, दृष्टी पडता सहज चित्त वेधे'. त्याच्या डेखावर दुधाचा बिंदू आहे. त्यामुळे ते पुष्पसृष्टीचे लहान बाळ आहे, असा अत्यंत सुंदर कल्पनाविलास करतात. शेवटी म्हणतात, असे हे फूल मी देवी शारदे तुला वाहतो. कविता मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

तगरीसारखेच आयुष्य निष्ठावान सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचे असते. वरिष्ठ जो आदेश देतील त्यासाठी तन, मन, वेळप्रसंगी धनाने ते झिजत असतात. संस्थेसाठी पक्षासाठी अहोरात्र तन्मयतेने काम करतात. पण बिचाऱ्याना कधीही मंचावर जाण्याचा मान मिळत नाही. कार्यक्रम असेल तर हटकून या लोकांची आठवण येते. त्यांच्याशी संपर्क साधला जातो. स्वयंसेवकाची भूमिका असल्यामुळे तेही सर्वतोपरी मदत करतात. पु.लं.च्या नारायणासारखी. पण आभार मानायच्या वेळेला संस्थेला त्यांचा विसर पडतो. ते त्याची खंत बाळगत नाहीत. कारण ते खरेच निष्काम कर्मयोग करीत असतात. मला त्यांच्या वागण्यात व तगरीच्या फुलात साम्य दिसते. आपणही सर्वांनी तगरीसारखे आयुष्य जगायचे ठरवले, तर किती चांगले होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by shubhada sapre