esakal | आनंद डाळिंबांच्या दाण्यातील
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

आनंद डाळिंबांच्या दाण्यातील

sakal_logo
By
स्नेहा आगाशे

डाळिंबांच्या दाण्यांशी आठवणी लगडल्या कधी घेतल्याच्या, कधी दिल्याच्या. त्यातील आनंद दाण्यांसारखाच टिपून घेतला.

लाल चुटुक डाळिंबाचे दाणे काढताना मन नकळत कधी भूतकाळात गेले कळलेच नाही. पूर्वी डाळिंब इतकी मुबलक मिळत नव्हती, त्यामुळे महागही असायची. वर्षातून एकच हरितालिकेचा उपवास आई करायला सांगायची. मग काय लेकीचा उपवास म्हणून बाबा कितीही महाग असले तरी डाळिंब आणायचेच. त्यांनी प्रेमाने काढून ठेवलेले दाणे खाताना काय अत्यानंद व्हायचा. नंतर घरात बच्चे कंपनी होती तेव्हा काढलेले वाडगाभर दाणे येता-जाता केव्हाच फस्त व्हायचे. तसेच पिंजऱ्यातील लाडका राघू पण गोड हाक मारून त्याचा वाटा मागून घ्यायचा. या आल्हाददायक आठवणी मनामध्ये तरळून गेल्या त्या अगदी हळुवार मोरपिसाच्या स्पर्शासारख्या...! अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी, बाजारात निघाले की सासरे आठवण करायचे डाळिंब आणशील ना? मला पण त्यांचा म्हातारपणातील हट्ट पुरवायला आवडायचा. त्यांना दाणे काढून दिले की आपसूकच मला पूर्वी मिळालेल्या आनंदाची आठवण व्हायची. नंतर सुनेला तिच्या गर्भारपणात दाणे काढून दिले तेव्हा तिने घेतलेला आस्वाद व येणाऱ्या जिवाची पण तृप्ती मनाला सुखावून गेली.

आता पुन्हा हेच डाळिंबाचे दाणे काढताना मन पळभर भविष्यातही धावले. आता परदेशातून नातू आला की त्याला हेच लाल चुटुक दाणे मोहवतील व ‘आजी अजून’ म्हणून हात सारखा पुढे येईल. त्या छोटुकल्या तळव्यांवर दाणे ठेवताना पुन्हा एकदा अशीच आनंदाची देवाण घेवाण होईल. बाबांच्या आनंदाच्या लुटीचा वारसा अखंड चालू ठेवल्यामुळे बघा तरी ही निःस्वार्थ देवाण-घेवाण नकळत चार पिढ्या जोडून गेली त्याच प्रेमाने...! डाळिंबाशी निगडित भूतकाळातील व वर्तमानातील हा सुखद आनंद मी पुन्हा एकदा त्या मोहक लाल चुटुक दाण्यांसारखाच टिपून घेतला. भविष्यामध्येही ही आनंदाची लूट सर्वांना मिळावी म्हणून शब्दांमध्ये गुंफली.