बैलगाडीतून...

सुधा डोके
मंगळवार, 23 जुलै 2019

नदीच्या मध्यात बैलगाडीची चाके रुतू लागली आणि घाबरगुंडी उडाली. त्यादिवशी बैलगाडीच्या प्रवासाची हौस फिटली.

नदीच्या मध्यात बैलगाडीची चाके रुतू लागली आणि घाबरगुंडी उडाली. त्यादिवशी बैलगाडीच्या प्रवासाची हौस फिटली.

सुटीत आजोळी जायचे तर रहिमतपूरपर्यंत रेल्वेने व पुढे अंगापूरपर्यंत बैलगाडीचा प्रवास करावा लागत असे. एके सायंकाळी आम्ही भावंडे रहिमतपूरला पोचलो. मामाने बैलगाडी पाठवली होती. सर्व सामान बैलगाडीत ठेवून आम्ही एकमेकाला धरून बैलगाडीत बसलो. चाकांचा खडखडाट, बैलांच्या घुंगराचा आवाज व गाडीवानाचे गाणे. संध्याकाळचे वातावरण अगदी छान होते. त्याला आम्ही बहीण-भावंडे टाळ्या वाजवून साथ देत होतो. वाटेत कृष्णा नदी ओलांडावी लागायची. उन्हाळ्यामुळे नदीला पाणी थोडे असे. बैलगाडीतून किंवा पाण्यातून चालत नदी ओलांडता येत असे. आमची गाडी नदीच्या जवळ उताराला लागल्यामुळे बैल जोरात पळू लागले. आम्हाला खूप मजा वाटू लागली. आमचा बैलगाडीत बसून पाण्यातून जाण्याचा पहिलाच प्रवास होता. उत्सुकता, आनंद व थोडी वेगळी गंमत.

गाडी नदीच्या मध्यापर्यंत गेल्यावर गाडीची चाके वाळूत रुतू लागली. बैलांना गाडी ओढणे कठीण जाऊ लागले. आता गाडीचे एक चाक वाळूत रुतून बसले. ते काही पुढे सरकायला तयार नाही. नदीचे वाहते पाणी बैलांच्या नाकातोंडात जाऊ लागले. बैलांची ताकद कमी पडू लागली. गाडीवान काका व आम्ही खूप घाबरलो. अंधार पडू लागला. त्यातच माझ्या पायाला खिळा लागून रक्त येऊ लागले. कशीबशी जखम बांधली. आता चाक वाळूत आणखी रुतल्यामुळे गाडी एका बाजूला कलली. पाणी गाडीत येऊ लागले. सामान ओले होऊ लागले. अंधार, जोराचा वारा, वाहते पाणी, नदीचा मध्य यामुळे आमचा आरडाओरडा, किंचाळणे सुरू झाले. भीतीने आम्ही मांजरीच्या पिलाप्रमाणे एकमेकांना बिलगून बसलो. आमचे ओरडणे ऐकून पारावर बसलेली सात-आठ तरुण मुले पोहत आली. आम्हाला एकेकाला दुसऱ्या काठावर आणले. उन्हाळा असूनसुद्धा थंडीने, भीतीने आम्ही कुडकुडत होतो. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. रस्त्यावर दिवे नसल्याने अंधार जास्तच गडद झाला. थोड्या वेळाने गाडीवान बैलांना घेऊन आला. आम्हाला थोडी तरतरी आली. आम्ही अंगापूरला पोचलो. मामा, मामी, आजी वाटच पाहत होती. बैलगाडीच्या प्रवासाची पुरती हौस फिटली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sudha doke