चहा... एक निमित्त

सुकृत देव
Saturday, 14 December 2019

आंतरराष्ट्रीय चहा दिवस उद्या १५ डिसेंबर रोजी साजरा केला जाईल, त्यानिमित्ताने चहाची आठवण.

आंतरराष्ट्रीय चहा दिवस उद्या १५ डिसेंबर रोजी साजरा केला जाईल, त्यानिमित्ताने चहाची आठवण.

भारतात चहासाठी काहीही निमित्त चालते. किंबहुना चहा हेच एक निमित्त असते. सबंध भारतात चहा एक लोकप्रिय पेय आहे. चहाची आंतरराष्ट्रीय लोकप्रियताही खूप आहे. आपण चहापत्ती दुधामध्ये टाकून ‘व्हाइट टी’ पितो, तर काही ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक प्रकारच्या चहाचा आस्वाद घेत असतात. ‘अमृततुल्य’चा चहा घेणे पुणेकरांना पसंत असते. सध्या अमृततुल्य चहाचाही बदलता ‘ट्रेंड’ आपण बघतच आहोत. कुणी गावाच्या नावाने चहा गाजवतं, तर कुणी देवाच्या नावाने. कुणी प्रेमाचा चहा पाजतं, तर कुणी आईच्या मायेचा चहा. काचेच्या ग्लासमधून किंवा स्टीलच्या छोट्या पेल्यातून चहा मिळायचा, त्याऐवजी पांढऱ्या कपमधून चहा प्यायची सवय होते आहे. त्यामुळे आधीची अमृततुल्यही बदलत चालली आहेत, किंबहुना त्यांना टिकण्यासाठी बदलावं लागत आहे.

चहा एक निमित्त नक्कीच आहे, ज्यामुळे लोक एकमेकांस भेटतात. व्यावसायिकांची चहानेच बोलणी सुरू होतात आणि चहानेच संपतात. आपण आप्तमित्रांना घरी प्रेमाने बोलावतो तेही ‘या चहाला’ असं म्हणत. लग्न ठरवून करायचं झालं तर, किंवा प्रेमविवाहातही ज्येष्ठांची बोलणी होणार असतील, तर ‘चहा-पोहे’चा कार्यक्रम व्हावा लागतो. चहाच्या निमित्ताने लोक जवळ येतात, गप्पा मारतात, विचारांची देवाण- घेवाण होते, बैठका होतात, व्यवहारदेखील ठरतात. तर, शेवटी निष्कर्ष असा आहे, की ‘चाई पे चर्चा’ उत्तम असते. माझे कार्यालय शनिवार पेठेत आहे. कार्यालयात येणारे माझे सर्व क्लायंट, मित्र, नातेवाईक, ओळखीचे असे कुणीही आले तरी चहा घेतल्याशिवाय जात नाहीत. कार्यालयीन काम असो, गप्पा मारणे असो, बैठक असो, चहाला तेवढं निमित्त पुरतं.
... तर मग मंडळी येताय ना चहाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sukrut deo