लाना यहाँ सिंगापूर

सुनंदा जप्तीवाले
Saturday, 30 November 2019

आपल्याकडची बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी, वाढते अपघात, प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःची गाडी घेऊ न शकणाऱ्या सिंगापूरवासीयांऐवजी आपलीच कीव वाटते.

आपल्याकडची बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी, वाढते अपघात, प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःची गाडी घेऊ न शकणाऱ्या सिंगापूरवासीयांऐवजी आपलीच कीव वाटते.

माझा मुलगा सुहास नुकताच ऑफिसच्या कामासाठी सिंगापूरला गेला होता. त्याच्याकडून समजले की सिंगापूरमध्ये स्वतःची गाडी घेणे खूपच अवघड! मनात आले आणि घेतली कार असे चालत नाही. गाडी घेण्यासाठी शासनाचा परवाना लागतो. मर्यादित वाहनांनाच परवाना मिळतो. या परवान्यासाठीची रक्कमही जबरदस्त असते. शिवाय महामार्गावरच नाही तर शहरामध्येही जागोजागी टोल भरावा लागतो. टोलनाका नसतोच. तुमच्याही नकळत ऑटोमॅटिक टोल वसूल केला जातो. तिथे सार्वजनिक ठिकाणी पार्किंगचे दरही भरमसाट आहेत. एकूण स्वतःची गाडी घेणे अवघडच! पण तिथे राहणारे कसे हिंडत-फिरत असतील? त्याबद्दल कळले ते तर सुखद आश्‍चर्याचा धक्का देणारे, स्वप्नवतच वाटले! तिथे सगळे सर्रास बस व मेट्रोने फिरतात. मेट्रोला एमआरटी म्हणजे मास रॅपिड ट्रान्झिट म्हणतात. ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकदम चोख! वेळापत्रकाप्रमाणेच चालते. त्याचं एक ॲप आहे. त्यावर आपल्याला हवी ती बस/ मेट्रो आता कुठे आहे? आपल्या थांब्यावर कधी येईल? हे सगळे दिसते. त्याप्रमाणे थांब्यावर पोचायचे, वेळेत निघून वेळेवर मुक्कामी पोचणार याची खात्री! एवढी सोयीची, सक्षम वाहतूक व्यवस्था असेल तर स्वतः गाडी घेण्याची गरजच नाही. बरं या प्रवासात पैसे देण्यासाठी एकच ट्रॅव्हल कार्ड वापरतात. कितीही वहानं/ कितीही वेळा बदलून प्रवास केलात तरी सुरुवातीच्या तुमच्या थांब्यापासून तुम्ही उतरेपर्यंतच्याच प्रवासाइतके थेट प्रवास भाडेच द्यावे लागते. टॅक्‍सीचे शुल्कही याच कार्डवर केले तर सवलतही मिळते. ट्रॅव्हल कार्डने पैसे देणेही मजेदार! बसने प्रवास करताना पुढच्या दारानेच प्रवेश करायचा. चालकाशेजारी ठेवलेल्या मशिनवर कार्ड स्वाइप करायचे. मागच्या दरवाजानेच उतरायचे. तिथल्या मशिनवर आठवणीनं कार्ड स्वाइप करायचे, म्हणजे तुमचा प्रवास संपतो. तिकिटाचे पैसे देणे थांबते. वाहक नसतोच. मेट्रोच्या स्थानकामध्ये प्रवेश आणि बाहेर पडणे (एक्‍झिट) दोन्ही त्या कार्डनेच इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने होते. मनात आले आपण सिंगापूरला जाण्याऐवजी ‘जीवनमें एक बार लाना यहाँ सिंगापूर’ असे म्हणावे, तसे स्वप्न पाहावे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sunanda japtiwale