चंदनापरि 'चंदन'चि

उर्मिला राजेंद्र शहा
शुक्रवार, 26 जुलै 2019

किरकोळ डोकेदुखी वाटली, पण मुलाच्या आजाराचे स्वरूप ऐकून हतबल झाले होते. एवढ्यात फॅमिली डॉक्‍टरनी येऊन सारी सूत्रे हाती घेतली.

किरकोळ डोकेदुखी वाटली, पण मुलाच्या आजाराचे स्वरूप ऐकून हतबल झाले होते. एवढ्यात फॅमिली डॉक्‍टरनी येऊन सारी सूत्रे हाती घेतली.

तो दिवसही काळा होता आणि ती रात्रही. दिवसभर मुलगा झोपूनच होता, पण असेल डोके वगैरे दुखत म्हणून थोडेसे दुर्लक्ष झाले. पण संध्याकाळीही तो उठायला तयार नाही म्हणून दवाखान्यात नेले. डॉक्‍टरांना काही शंका आली. त्यांनी एमआरआय करायला सांगितले आणि त्याचा रिपोर्ट बघताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मुलाला ताबडतोब अतिदक्षता विभागात नेण्यात आले. उपचार सुरू झाले. परिस्थिती बिघडत चालली होती. काय करावे सुचत नव्हते. आक्रंदन करणारे मन देवाला साकडे घालत होते. रात्र अधिक काळोखी वाटू लागली. एक आई हतबल होती. कुटुंबातील सगळेच अस्वस्थ होते. मन देवाला विनवत होते. काय हवे ते घे, पण माझे बाळ मला परत दे.

बुडत्याला काडीचा आधार मिळावा, खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजाला जवळच किनारा दिसावा, वाळवंटात भटकणाऱ्या तहानलेल्याला निर्मळ पाण्याचा झरा दिसावा किंवा घोर अंधारात भटकणाऱ्याला प्रकाशाचा किरण दिसावा तसेच झाले. आमचे फॅमिली डॉक्‍टर वसंत चंदन धावत आले आणि सारी सूत्रे त्यांनी हाती घेतली. फॅमिली डॉक्‍टरच्या अधिकाराने त्यांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यांच्या ओळखीमुळे तातडीच्या शस्त्रक्रियेची तयारी वेगाने झाली. रात्री साडेनऊ वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून पुढे चार तास ते स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होते. त्यांनी "मुलाला सुखरूप परत आणण्याचे' वचन एका आईला दिले आणि ते त्यांनी पूर्णही केले. त्यांच्या दवाखान्यात "एफओसी' हा शब्द बऱ्याच वेळा ऐकू येतो. एफओसी म्हणजे "फ्री ऑफ कॉस्ट'. बऱ्याच गरजूंना मोफत औषधे देऊन ते मदत करतात. आजाराच्या ग्रीष्माने ग्रासलेल्या लोकांच्या जीवनात चंदनाप्रमाणे झिजून ते नाव सार्थक करीत आहेत, असे वाटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by urmila shah