माणसातील देव!

वैजयंती वर्तक
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कुणी देव पाह्यलाय का? हो, हो मी पाहिला आहे- माणसातला देव!

कुणी देव पाह्यलाय का? हो, हो मी पाहिला आहे- माणसातला देव!

माझ्या मुलाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. कोणत्याही रुग्णालयात रुग्ण दाखल करताना सुरवातीलाच बरीच रक्कम भरावी लागते; पण डॉ. अविनाश व डॉ. अमिता फडणीस यांनी आमच्याकडून एकही पैसा घेतला नाही. त्यांच्या डॉक्टरांबरोबरच आम्ही बाहेरून आमच्या डॉक्‍टरांना बोलावले, तेव्हाही त्यांनी कधीच मनाई केली नाही. बरेच दिवस मुलगा तेथे अतिदक्षता विभागात होता. नंतर घरी आणायचे, तर घरी सर्व सोय करणे गरजेचे होते. डॉक्टरांनी माझ्या सुनेला सांगितले, ‘‘तुला जी व्यवस्था घरी लागणार आहे, ते सर्व आपल्या रुग्णालयामधून ने.’’ घरी यूपीएस बसवावा लागणार होता. मुलाचा मित्र अमर चक्रदेव यूपीएस बसवून गेला. तो पैशाचे नावच काढू देईना.

मुलगा व्हेंटिलेटरवर होता. त्यामुळे दिवसरात्र विजेची गरज होती. एक दिवस आमच्या सोसायटीत दिवसभर वीज गायब! बॅकअपचीही मर्यादा संपत चालली. काहीतरी मोठा बिघाड झाला होता. आमच्या शेजारच्या इमारतीत डॉ. संतोष भन्साळी राहतात. परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच त्यांच्या घरून आम्हाला वीज दिली. एक दिवस संध्याकाळी अचानक व्हेंटिलेटर बंद पडला. आम्ही अनिल इंगळेंकडून व्हेंटिलेटर भाड्याने घेतला होता. त्यांना कळवले. ते नुकतेच कामावरून घरी परतून चहा घेण्याच्या तयारीत होते; पण निरोप मिळताच चहासुद्धा न घेता ते लगेच निघाले आणि अक्षरशः दहाव्या मिनिटाला दुसरे मशीन घेऊन हजर झाले. क्षणाक्षणाचे महत्त्व अशाच वेळी कळते. अहो, देव म्हणजे काय? सतत तुमच्या सोबत असणारा, तुमच्या गरजेला, हाकेला धावून येणाराच नव्हे काय? हे सगळे आमच्यासाठी ‘देव’च आहेत. यांचे हे देवपण म्हणा, उपकार म्हणा, कधीच विसरले जाणार नाहीत. हे उपकार फेडण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहाणेच, मी पसंत करेन व तसे वागायचा सतत प्रयत्न करेन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vaijayanti vartak