पन्नास वर्षांपूर्वी...

विद्या मराठे
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

ठरलेल्या दिवशी मी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. पण, मला उतरवून घ्यायला नवरा आलाच नाही.

ठरलेल्या दिवशी मी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. पण, मला उतरवून घ्यायला नवरा आलाच नाही.

आज त्या घटनेला बरोबर पन्नास वर्षे झाली आहेत. पाच ऑक्टोबर १९६९ हा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. लग्न झाल्यानंतर माझा नवरा संख्याशास्त्रात पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जाणार होते. त्याप्रमाणे ‘तो’ दिवस ठरला होता. ठरल्याप्रमाणे मी त्या दिवशी न्यूयॉर्क विमानतळावर उतरले. इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार आटोपून बाहेर आले आणि उत्सुकतेने नवरा कुठे दिसतो आहे का ते पाहू लागले. पण, त्याचा कुठे मागमूसही दिसेना. लांबून यायचे आहे, तेव्हा थोडा वेळ लागला असेल असे म्हणून वाट पाहू लागले. पण सर्व लोक निघून गेले. विमानतळावर सामसूम झाली तरी याचा पत्ता नव्हता. मग मात्र मला जरा काळजी वाटायला लागली. आयुष्यात मी पहिल्यांदा भारताबाहेर आले होते. वय केवळ एकवीस. अगदी भांबावून गेले होते.

एवढ्यात एक अमेरिकी गृहस्थ आस्थेने माझ्याजवळ येऊन काय अडचण आहे हे विचारू लागला. पहिल्यांदा त्याला काय सांगावे हेच कळेना. शेवटी काय घडले आहे हे त्याला सांगितले. तो म्हणाला, ‘‘काही काळजी करू नकोस. आपण बघू काय करता येईल ते. तुझ्याकडे त्याचा फोन नंबर आहे का?’’ सुदैवाने तो होता. त्याने तिथल्या बुथवरून माझ्या नवऱ्याला फोन केला. मी अमेरिकेत आले असल्याचे ऐकून माझा नवरा चकितच झाला. मला म्हणाला, ‘‘अगं, पण तू उद्या येणार होतीस ना? आज कशी आलीस? तारखेच्या बाबतीत काहीतरी घोटाळा झाला आहे बहुतेक. पण, काळजी करू नकोस. मी माझ्या न्यूयॉर्कच्या मित्राला फोन करून तुला त्याच्या घरी घेऊन जायला सांगतो आणि मी सकाळपर्यंत तुला न्यायला येतो. घाबरू नकोस.’’ त्याचा मित्र येईपर्यंत तो अमेरिकी सद्‍गृहस्थ माझ्याजवळ उभा होता. आजही राहून राहून माझ्या मनात येते, तो गृहस्थ माझ्या मदतीला धावून आला नसता तर काय झाले असते? नुसत्या कल्पनेनेदेखील माझ्या अंगावर आजही शहारे येतात. आणि मी अशी धांदरट, त्याचे नावदेखील विचारले नाही. त्याचे आभार मानले होते की नाही तेदेखील आठवत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vidya marathe