माणसातील देव

विद्या नाडगौडा
Wednesday, 11 March 2020

रस्त्यावरचे अनाथ मूल देवालयाच्या पायरीवर झोपलेले असताना सनाथ झाले आणि त्याचे आयुष्य घडले.

रस्त्यावरचे अनाथ मूल देवालयाच्या पायरीवर झोपलेले असताना सनाथ झाले आणि त्याचे आयुष्य घडले.

‘‘अहो ताई, मला फार भूक लागली हो. काही खायला देता का?’’ असं कळवळून एक मुलगा सारखा माझ्यामागे लागला होता. मी खूप गडबडीत होते तरी त्याला एक पोळी, भाजी खायला दिली व बस पकडायला निघून गेले. पण पुढे रोजच असे घडायला लागले. मग मी रोज दोन पोळ्या, भाजी जास्तच घेऊन जाऊन त्याला देऊ लागले व ठरविले, की त्याला सगळी माहिती विचारायचीच. कारण मला उत्सुकता लागून राहिली होती, की देखण्या मुलाला कोणी सांभाळत कसे नाही? त्याच्याकडे विचारपूस केली तर त्याचे डोळे पाण्याने भरून आले. म्हणाला, ‘‘मला माहिती नाहीत माझे आई-बाबा कोण? कुणापुढेही हात पसरून पोट भरतो. नाइलाजाने. देवळाजवळच्या पायरीवर झोपतो. गार पाण्याने आंघोळ करतो. मिळेल ते खातो.’’ या भेटीनंतर काही दिवसांनी तो अचानक दिसेनासाच झाला. मला एकदम धस्सच झाले. मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्याने कंटाळून आत्महत्या तर केली नसेल? कोणी त्याला तेथून हाकलून तर नाही ना दिले? पुढे रोजच्या धावपळीत मी त्याला विसरून गेले.

पुढे मी निवृत्त झाले. रोज थोडे फिरून यायचे. एके दिवशी त्याच देवळाजवळ डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली पडले. तेवढ्यात माझ्याजवळ एक गाडी येऊन थांबली. मला कुणीतरी उठवून गाडीत बसवले. तो पंचवीस-सव्वीस वर्षांचा तरुण माझ्याशी बोलू लागला, ‘‘ताई, तुमचा पत्ता सांगता का? मी गाडीतून तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.’’ कोण कुठचा हा मुलगा माझी विचारपूस करतो आहे. मी त्याच्याकडे आश्‍चर्याने पाहू लागले. तोच पुढे म्हणाला, ‘‘ताई, मी येथेच तुमच्याकडे उपाशीपोटी पोळी-भाजी मागत असे, आठवते का?’’ आता मी आणखीनच आश्चर्याने पाहू लागले. तो सांगू लागला, ‘‘एका पहाटे मी झोपलो असताना माझ्या हातावर देवळातल्या भटजींचा पाय पडला. मी ओरडलो. त्यांनी विचारले, इथे का झोपलास? मी त्यांना माझी हकीकत सांगितली. गुरुजींना माझी दया आली. ते मला त्यांच्याबरोबर घरी घेऊन गेले. ते दोघेच राहायचे. मला आई-वडील मिळाले. शिक्षण सुरू झाले आणि इथवर पोचलो. तुमच्या पोळी-भाजीने इथवर पोचवले.’’ ताई म्हणून हाक मारणारा हा भाऊ आता दर भाऊबिजेला हक्काने घरी येऊ लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vidya nadgauda