डिंकाचे लाडू

विकास उमराणीकर
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

आपली कुठे कशी फजिती होईल याचा नेम नसतो. डिंकाचा लाडू पाहिला की अजून ‘त्या’ फजितीचा किस्सा आठवतो.

आपली कुठे कशी फजिती होईल याचा नेम नसतो. डिंकाचा लाडू पाहिला की अजून ‘त्या’ फजितीचा किस्सा आठवतो.

नगरला नुकताच बॅंकेत नोकरीस लागलो होतो. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहिले क्लिअरिंग करून साडेबारा वाजता बॅंकेत आलो. क्लिअरिंग रजिस्टर, चेक्‍स आणि स्टेट बॅंकेतील शीट अधिकाऱ्यांना सुपूर्त केले आणि तासाभरात रेल्वे स्टेशनला जाऊन येतो, असे सांगून निघालो. माझे आई-वडील एका समूहाबरोबर काश्‍मिर सहलीला निघाले होते. त्यांची गाडी नगरवरून पुढे जाणार होती. सायकलच्या दुकानातून भाड्याने सायकल घेतली आणि तडक स्टेशन गाठले. पॅसेंजर गाडी वेळेत आली. यात्रा कंपनीचा वेगळा डबा होता. वडिलांनी खिडकीतूनच हाक मारताच मी धावतच बोगीकडे गेलो. वडिलांच्या मित्राच्या पत्नीने मला कौतुकाने डिंकाचा लाडू हातात दिला आणि तिथेच खायला सांगितले. मी मजेत चवीने लाडू खात होतो. एवढ्यात गाडी सुरू झाली. मी पटकन सगळ्यांना नमस्कार करून दाराजवळ आलो. परंतु दार काही केल्या उघडेना. इकडे गाडीने वेग घेतला, गाडी फलाट सोडून मार्गस्थ झाली. गाडीचा हा डबा स्पेशल यात्रेचा असल्यामुळे कोणीतरी दरवाजा भक्कम लावून घेतला होता. मला घाम फुटला. पुढचे स्टेशन पाच किलोमीटरवर होते. मी पुढील स्टेशनची वाट बघू लागलो. निंबळक आले आणि मी खाली उतरलो.

आता मला परत नगरला परतीचा प्रवास करायचा होता, म्हणून मी चौकशीसाठी स्टेशनच्या बाहेर पडू लागलो. तर समोर नवीनच संकट तिकीट तपासनीसाच्या रूपात उभे होते. माझ्याकडे तिकीट नव्हते, मी पुरता गोंधळून गेलो होतो. मग मी स्टेशनबाहेर जाण्याऐवजी सरळ रेल्वे रुळावरून उलट्या दिशेने चालायला सुरवात केली. दुपारच्या कडक उन्हामध्ये पायपीट करीत मी दुपारी तीन वाजता नगरला पोचलो. आता मला नवीनच काळजी वाटत होती की आपली सायकल (भाड्याची) सुखरूप असेल ना? कारण तिला कुलूप नव्हते. परंतु सायकल जिथे लावली होती तेथे उभी होती. तडक सायकलवरून निघालो. आता भूक जाणवली. सायकलच्या दुकानासमोर केळीवाला दिसला, त्याच्याकडून एक डझन केळी घेतली. अधाश्‍यासारखी सहा केळी फस्त केली आणि उरलेली केळी घेऊन दुपारी साडेतीनला बॅंकेत पोचलो. उरलेली केळी खात सर्वांनी मजेत माझ्या फजितीचा किस्सा ऐकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vikas umranikar