छोटासा ब्रेक!

विश्वास दात्ये
Wednesday, 18 March 2020

धकाधकीच्या आयुष्यात छोटासा ‘ब्रेक’ अधूनमधून हवाच. पण तो वर्तमानापासून दूर पळण्यासाठी असू नये, तर नवे काही अनुभवण्यासाठी असावा.

धकाधकीच्या आयुष्यात छोटासा ‘ब्रेक’ अधूनमधून हवाच. पण तो वर्तमानापासून दूर पळण्यासाठी असू नये, तर नवे काही अनुभवण्यासाठी असावा.

संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्या आल्या माझ्या मुलाने जाहीर केले, ‘‘मला आता ‘ब्रेक’ची फारच गरज आहे. दोन महिने झाले एक पण ‘ब्रेक’ घेतला नाही.’’ गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ‘ब्रेक’वरून परत आला आणि एवढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की, ‘‘गेले चार दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले, झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले आहे.’’ मनात आले की असला त्रासदायक ‘ब्रेक’ घ्यायचाच कशाला! काय आहे ही ‘ब्रेक’ नावाची भानगड? ‘ब्रेक घेणे’ म्हणजे रोजच्या जीवनचक्रातून काही काळ जरा दूर जाणे. ‘ब्रेक’चा पहिला प्रकार म्हणजे, आहे त्या परिस्थितीपासून पळवाट म्हणून दूर जाणे. या प्रकारात, कुठल्याही गोष्टीचा पटकन कंटाळा येणे, सतत असमाधानी असणे, घरच्या सुग्रास अन्नाचा सतत कंटाळा येणे, स्वतः पत्करलेल्या कामात आनंद न वाटणे, सतत नोकऱ्या बदलणे, कुठलीही कृती सातत्याने न करू शकणे अशी लक्षणे दिसतात. हे लोक कशापासून तरी सतत दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी प्रवासाला गेले तरी तेथेही मनाला आणि शरीराला जराही निवांतपणा देत नसल्याने हे लोक ‘ब्रेक’नंतर हमखास दमून शिणून येतात. काही तर परत आल्यावर अति थकव्याने चक्क आजारी पडतात. असे ब्रेक घेण्यापेक्षा, असू तेथेच मानसिक आणि शारीरिक संतुलन सुधारण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम. प्रयत्नांती ते जमतेही.

या उलट दुसरा प्रकार आहे. या लोकांना आहे तेथे, असू तसे, मिळेल त्यात आनंदी आणि समाधानी राहता येते याचे गमक कळलेले असते. हे लोक कशापासून तरी दूर पळण्यासाठी ‘ब्रेक’ घेत नसतात. हे लोक ‘ब्रेक’ घेतात ते निवांत प्रवास करण्यासाठी, नवीन काहीतरी बघण्यासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी. हे लोक ‘ब्रेक’नंतर अत्यंत आनंदी आणि उत्साही होऊन परततात. तर काय मंडळी, मी स्वानुभवातून खात्रीलायकपणे सांगू शकतो की, ‘ब्रेक’ जरा विचारपूर्वक योग्य कारणासाठी घ्या आणि बघा तर किती मजा येते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vishwasy datye