अस्तित्व खुणा

कल्पना जाखडे
बुधवार, 29 मे 2019

मला वाटलं की पिलू या रूममध्ये अकडले असेल, म्हणून मी जाळीचा दरवाजा उघडला; पण माझ्या दरवाजा उघडण्याआधीच तो पसार झाला.

मला वाटलं की पिलू या रूममध्ये अकडले असेल, म्हणून मी जाळीचा दरवाजा उघडला; पण माझ्या दरवाजा उघडण्याआधीच तो पसार झाला.

आमच्या मोठ्या बंगल्यात सध्यातरी आम्ही दोघंच आणि तो असतो. इवलासा राखाडी, पिवळसर चिमणीहूनही आकाराने लहान चोच; मात्र मस्त मोठी असलेला, इवलाले काळेभोर डोळे असलेला तो पक्षी गेले तीन महिने स्वयंपाकघराच्या बाहेरच्या कॅनॉपी कम रूममध्ये अगदी बारीक जाळीतून येऊन कपडे वाळत टाकायच्या दोरीवर बसतो. तिथे एक कपड्यांसाठी हॅंकरही आहे. त्याला पकडून ही स्वारी संध्याकाळी येते आणि सकाळी उजाडल्यावर जाते. मी जेव्हा पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा मला वाटलं की पिलू या रूममध्ये अकडले असेल, म्हणून मी जाळीचा दरवाजा उघडायला गेले; पण माझ्या दरवाजा उघडण्याआधीच तो जाळीतून पसार झाला. नंतर पुन्हा थोड्या वेळाने ऐटीत दोरीवर बसला. जणू काही कसं चुकवलं तुला? असा खोडकर अविर्भाव वाटला. त्यातच माझा मोठा मुलगा सून-नाती सुटीसाठी राहायला आल्या. त्यांच्याकडे एक पोपटासारखाच पक्षी आहे. पण तो पिंजऱ्यात आहे. त्याला घेऊन ते आले नि पुढच्या रूममध्ये पिंजरा ठेवला. तेवढ्यात याची स्वारी चिवचिवाट करत घिरट्या घालत जणू काही ही जागा माझीच आहे. हे कोण आलंय इथं. अशा चिवचिवाट करत घिरट्या घालत समोरच्या झाडावर जाऊन बसला. रागावलेला होता. आलाच नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अगोदरच आपली दोरीवरची जागा फिक्‍स करून स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ येऊन चिवचिवाट करून मी आलोय हे जणू सांगत असावा. यजमान त्या रूममध्ये हळूच खुर्चीवर बसून त्याच्याकडे बघतात. शीळ घालतात. शूज घालून बाहेर पडतात; पण हा पठ्ठ्या ढिम्म. शांतपणे त्यांच्या हालचाली बघून बसतो. तो संध्याकाळी आला की जणू माझं नातवंड आलंय असंच वाटतं. मी त्याला काहीही खायला देत नाही. फक्त पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याचे डबे बंगल्याच्या अवतीभवती असतात; पण हा चिमणा जीव फक्त संध्याकाळी त्या रूममधल्या दोरीवर बसतो. माझ्याकडे बघत असतो. त्याचं अस्तित्व म्हणजे आम्ही दोघंच या घरात नसून अजूनही आपल्याला सोबत करायला एक छोटा जीव बाहरेरच्या रूममध्ये असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by kalpana jakhade