तुझ्यात जीव 'गुंतला'

क्षमा एरंडे
बुधवार, 26 जून 2019

नको असलेले सामान अजिबात ठेवायचे नाही म्हणून आवरायला घेतले. पण, प्रत्येक वस्तूत जीव गुंतलेला. "वापरा व फेका' हे काही अजून जमत नाही.

नको असलेले सामान अजिबात ठेवायचे नाही म्हणून आवरायला घेतले. पण, प्रत्येक वस्तूत जीव गुंतलेला. "वापरा व फेका' हे काही अजून जमत नाही.

आज घर आवरायला घेतले आणि ठरवले, नको असलेले सामान टाकून द्यायचे. घर आवरले जाणार म्हणून मी सुखावले आणि दुखावलेही. कारण जपलेल्या अनेक वस्तूंना आज बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार होता. कमीतकमी वर्षभर न वापरलेल्या वस्तू मी टाकून देणार होते. पहिले निघाले बहुपयोगी पुरणयंत्र. त्यात पुरण तर बारीक व्हायचेच, शिवाय श्रीखंड, वाटली डाळ यासाठीही उपयोगी यायचे. आमचे हे म्हणालेच, ""गेल्या कित्येक वर्षांत मी घरी पुरणपोळी केलेली पाहिली नाही, श्रीखंड तर आपण बाहेरून आणूनच खातो.'' पण, पहिल्या पाडव्याला आईने दिलेले ते पुरणयंत्र मला टाकवेना. आणखीही काही वस्तू निघाल्या. काही काकी-मावशीने दिलेल्या, काही पहिल्या पगारात घेतलेल्या. त्या प्रत्येक वस्तूत माझा जीव गुंतलेला असल्याने शेवटी माझे "साहित्य संमेलन' काही काळापुरते घरातच ठेवले गेले.

खरेच किती बारीक सारीक गोष्टी आपण साठवून ठेवतो. आपणच अडगळ वाढवून ठेवतो आणि पसारा पसारा करत ओरडत बसतो. गोधड्या शिवायच्या म्हणून सुती साड्या-चादरी, पिशव्या शिवून घ्यायच्या म्हणून अर्धवट जुन्या साड्या सांभाळत बसतो. पण, गोधड्या-पिशव्यांसाठी कधीच मुहूर्त मिळत नाही. छोट्या मुलांचे कपडे फाटत नाहीत, वाढत्या वयामुळे त्यांना होत नाहीत. पण, ताईच्या नातवाला होतील म्हणून ठेवून दिले जातात, कारण भारीतले असतात ना कपडे. ताईच्या लेकीच्या लग्नाचा अजून पत्ता का नसेना, पण लाडक्‍या भाचीच्या होणाऱ्या बाळासाठी तजवीज करून ठेवतो. आपल्याला मोह सोडवत नाही आणि पसारा आवरत नाही. जेवढी मोठी जागा तेवढा पसारा अधिक. आताशा मोठी पातेली जरा कमीच लागतात. स्टिलचे पिंप पाणी भरून ठेवण्यापेक्षा जास्तीची वाट्या-भांडी ठेवण्यासाठी वापरले जाते. आमच्या लहानपणी बिस्किटासाठी पत्र्याचे मोठे डबे असायचे. ते डबे दुकानदारांकडून आणून महिन्याचे वाणसामान भरले जाई. पुढे पितळी डबे आले. कालांतराने स्टिलच्या डब्यांनी त्यांची जागा घेतली. आता "वापरा आणि फेका'चा जमाना आलाय. त्यामुळे उगीच भावनिक गुंते वाढत नाहीत. पण, राहू दे तेवढे पुरणयंत्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by kshama yerande