सुंदरतम रहस्ये

कुमुद कदरकर
शुक्रवार, 28 जून 2019

हा निसर्ग किती काय जपून ठेवतो, लपवून ठेवतो अन्‌ अचानक उधळून देतो. त्याचाच उत्सव होतो. सुंदराचा उत्सव.

हा निसर्ग किती काय जपून ठेवतो, लपवून ठेवतो अन्‌ अचानक उधळून देतो. त्याचाच उत्सव होतो. सुंदराचा उत्सव.

गेल्या वर्षी कॉसमॉसची चार-दोन रोपे आणली. थोडी फुले देऊन ती सुकली. पण या वर्षी अचानक कॉसमॉसची रोपे उगवलेली दिसली. ते हळदुले सौंदर्य माझ्या बागेत आपोआप फुलले. प्रवासात मोह घालणारे, भंडारा उधळल्यागत भासणारे तेजस्वी, चकाकणाऱ्या सुवर्ण रंगांचे ताटवेच्या ताटवे, त्याची रेशमी तलमता नजर ठरत नाही अगदी. घाटातले काय, कास पठारावरचे काय हे फुलणे असे अनोखेपणाचे कितीएक नजराणे. मातीतून हे हिरवे चैतन्य फुलते कसे? प्रश्‍न पडतात खरे, की उषःप्रभेच्या गालावर लाली कशी येते? पहाट मैफील सजवणाऱ्या पक्ष्यांच्या गळ्यात सूर कसे उमलतात? या वनश्रीत सृजनाकडे प्रवासाला निघताना पालवीचे कोंब कसे फुटतात? उत्तररात्री रातराणीच्या अत्तरकुप्या कशा सांडतात? शरद चांदणे पाझरताना त्याला झिरझिरणारा लावण्य प्रकाश कोण अर्पण करते? सावळ्या संध्येला कृष्णवस्त्र कोण देते? पारिजातकाला केशर पवळ्याचा देठ कोण चिकटवतो? कर्दळ पर्णावर रंगीत ठिपक्‍यांची रांगोळी कोण चितारतो? रानफुलांनी हिरव्या वाटा कशा सजतात? निळ्या आभाळात शुभ्र बगळ्यांच्या मोहनमाळेला कोण शिस्त लावते? मल्हार रागात वर्षा बरसणारी किमया कुठल्या जादूमुळे घडत असावी?

मयूराला नृत्यासाठी ताल व कोकिळेला गाण्यासाठी तान कोण पुरवते? विविध पुष्पात वेगवेगळे रंग, ढंग, सुगंध, नखरा, नजाकत, सौंदर्य कसे येते? समुद्राने स्वतःमध्ये वनस्पती, प्राणिसृष्टी, रहस्ये, रत्ने, गूढता दडवली कशी? भोपळ्याच्या गोलाईतून सतार बनताना अचानक सूर कसे जन्मतात? नेहमीचे वृक्षांचे जाणवणारे चैतन्य शिशिरात पर्णांचा साज हळुवार धरतीवर विसावतो व नवनिर्माणाचा सोहळा कुणाच्या साक्षीने चालू होतो? मंद झुळकीतून मोगरा सुगंधी लडी कशा उलगडतो? कोजागरीची रात असंख्य चांदणफुले माळून केवढी नटून बसते ना! इंद्रधनुची लावण्यखणी कमान झगझगते कशी अचानक? ही सारी धरा अस्तित्वाची जाग जपते कशी? हा कुणीतरी जादूगार आहे नक्की. त्याला काहीही म्हणा, त्याचीच ही कृपा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by kumud kadarkar