esakal | फक्त लढ म्हणा!
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

फक्त लढ म्हणा!

sakal_logo
By
मो. गो. मातापूरकर

कष्टाने त्याने पदवी मिळवली; पण शिक्षणाला अनुसरून नोकरी कशी मिळवावी हे त्याला कळत नव्हते. तो अस्वस्थ होता.

कर्मचारी व्यवस्थापनातील अधिकारी मित्राचा मला फोन आला, 'अरे, एक शिपाई आहे, कुठल्याही विभागात टिकत नाही. सर्व जण परत पाठवतात, काम करत नाही म्हणून. तुझ्याकडे पाठवू का?''
मी म्हटले, 'दे पाठवून.'' आणि आज तो समोर उभा होता. 'किती शिकला आहेस?'' मी विचारले. 'मी बीई झालो आहे, सर,'' तो म्हणाला. मी आश्‍चर्यचकित झालो. 'तू बीई होऊन शिपायाची नोकरी कशी करतोस?'' 'सर, खूप मोठी स्टोरी आहे.'' 'बैस'', मी खुर्चीकडे निर्देश केला, पण तो बसेना. खूप आग्रह केल्यावर बसला. 'माझा बाप याच ऑफिसमध्ये सफाई कामगार होता. रात्री खूप दारू प्यायचा, मला ठोकून काढायचा. पिऊन पिऊन लिव्हर खराब झाली. तो अकाली मरण पावला. आमची खायची पंचाईत झाली. मी नुकताच दहावी झालो होतो व सोळा वर्षांचा होतो. घरात मीच सर्वांत मोठा. कंपनीत मोठ्या साहेबांना भेटलो. ते म्हणाले, तू अठरा वर्षांचा झाला की ऑफिसात शिपाई म्हणून घेऊ. तोपर्यंत येथे रोजंदारीवर सफाईचे काम करीत जा.
रोज येथे सफाई काम करून मी अकरावी-बारावी पुरी केली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. येथे शिपाई म्हणून नोकरी सुरू झाली. अभ्यास करता यावा म्हणून मी कायम रात्रपाळी मागून घेतली. यंदा बीई झालो. पूर्वीचे साहेब बदलून गेले आहेत. नवीन साहेबांना भेटलो व विनंती केली, मला माझ्या शिक्षणाला अनुसरून नोकरी द्यावी. ते मला फक्त कारकुनाची नोकरी देण्यास तयार आहेत. मी नाही म्हणालो.''
त्याला योग्य नोकरी कशी मिळवावी कळत नव्हते. तो अगदी निराश झाला होता. मी त्याला सांगितले, 'आता तू या ऑफिसमध्ये नोकरी करू नकोस. तू इंजिनिअर झाला आहेस, तुला नोकरीमध्ये आरक्षणही आहे. वृत्तपत्रातील जाहिराती वाच. फक्त गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी आलेल्या जाहिराती वाच आणि अर्ज कर.'' 'काय मी एकदम मोठा अधिकारी होईन?'' 'हो, निश्‍चितच!'' सहा महिन्यांनी तो हसत आला. त्याला रेल्वेमध्ये इंजिनिअरिंग विभागात मोठ्या अधिकाऱ्याची नोकरी मिळाली होती. मला पेढे द्यायला आला. चांगले एक किलो पेढे. मी फक्त एक घेतला व त्याला आशीर्वाद दिला.

loading image