कोरा कॅनव्हास

मनाली ओक
गुरुवार, 20 जून 2019

कोणते घर माझे म्हणू मी... तिची कासावीस वाढत चाललेली. ही मनाची कोंडी फुटली आणि नवे चित्र खुणावू लागले.

कोणते घर माझे म्हणू मी... तिची कासावीस वाढत चाललेली. ही मनाची कोंडी फुटली आणि नवे चित्र खुणावू लागले.

फार दिवसांनी माहेरी आलेली ती, घरभर नुसतीच हिंडत होती. तिची नजर काहीतरी शोधत होती. सगळ्या खोल्यांमधल्या वस्तू तर जिथल्या तिथेच होत्या. ती तिथून गेली तेव्हा होत्या तशाच. तरी वेगळ्या का दिसत होत्या खोल्या? हरवलेले काही शोधायचे असल्यासारखी ती घरात हिंडत होती, घराला नव्याने भेटत होती. लग्नानंतर सुरवातीला धड कोणतेच घर तिला आपलेसे वाटत नव्हते. जिथून आलो त्याला परके झालो अन्‌ जिथे आलो ते घर तर आपले नव्हतेच, या जाणिवेने ती कासावीस व्हायची अधीमधी. पण आज का कोणास ठाऊक, माहेरघरातून हिंडताना हे पूर्वीचे तिचे घर आताही तिचेच असल्याची जाणीव तिला झाली. तिला लग्नापूर्वीचे ते दिवस आठवले, लग्नाच्या काहीच महिने अगोदर हे घर रंगवायला काढले गेले. पाहुणे येतील, लग्नघर चांगले दिसावे, नवीनपण यावे म्हणून. त्या वेळच्या रंगकामात फारसा सहभाग घेतलाच नव्हता तिने. वाटले होते, हे घर आपले नाहीच राहिले आता. आपण इथे पाहुण्या म्हणूनच येणार.

तिला याआधीचे रंगकाम आठवले. आपल्या खोलीसाठी विशिष्ठ निळसर छटेचा केवढा हट्ट धरला होता. एका भिंतीवर खास आवडीचे "संगीत' थीमचे चित्र तयार केले होते स्वतःच. तिने भिंतीच्या कोऱ्या कॅनव्हासवर गडद निळ्या रंगाचा फराटा मारला होता, लकेरीसारखा. त्याखाली जाड उभ्या रेषा. सुरांच्या पट्ट्या जणू. त्यांच्या मधून जाणारी एक जाड रेघ. खाली गोल. सूर अन्‌ संगीत दर्शविणारे अमूर्त चित्र. काही प्रत्यक्षपणे, काही कल्पनेत अशी बरीच चित्र रेखाटली होती तिने आपल्या घराच्या भिंतींवर. भिंती या कॅनव्हाससारख्याच असाव्यात असे वाटायचे तिला. कोऱ्या. ज्यावर कधीही कल्पनेतील चित्र रेखाटता येतील, कधी खरोखरीचीही. तिच्या लग्नानिमित्त केलेल्या रंगकामात तिची आधीची सर्व चित्रे पुसली गेली होती आणि आज कित्येक दिवसांनी तिला चित्र सुचत होते. आपल्या नव्या आयुष्यातील नवे रंग तिला खुणावत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by manali oak