सावधान सर्वदा

पद्माकर पुंडे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

वाहनचालकांचे प्रबोधन करणे योग्यच आहे. पण, त्याचबरोबर पादचाऱ्यांचेही प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.

वाहनचालकांचे प्रबोधन करणे योग्यच आहे. पण, त्याचबरोबर पादचाऱ्यांचेही प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.

परवा नामदार गोखले चौकात सिग्नलला उभा होतो. फर्गसन रस्ता आधीच खणून ठेवलेला चौकातच. त्यामुळे वाहतुकीची कोंडी. फर्गसन रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू होती. वाहने जोरात जात होती अन्‌ मी वाहनांसाठीचा सिग्नल थांबून समोर पादचाऱ्यांसाठीचा हिरवा दिवा लागण्याची वाट पाहत उभा होतो. आता होईलच दिवा हिरवा; मग थांबतील वाहने व जाईन मी, असे मनात म्हणत होतो. तेवढ्यात माझ्या बाजूने घाईघाईत तीन-चार युवतींचा छोटा थवा या धावणाऱ्या वाहनांच्या मधून कसरत करीत रस्ता ओलांडायला निघाला. तेही घाईघाईत. मी त्यांना म्हटले, ""अहो थांबा, हा सिग्नल बंद होऊ द्या; मग रस्ता ओलांडा.'' गडबडीत तसेच पुढे जाताना त्यातील एक युवती हसून म्हणाली, ""आजोबा तुम्ही थांबा दिवा लागेपर्यंत, आम्ही कसेही जाऊ शकतो.'' गंमत वाटली या तरुणाईची अन्‌ तितकीच काळजीही. अशा बेफिकीर वृत्तीतूनच अपघाताला आमंत्रण मिळते, हे त्यांना केव्हा अन्‌ कसे सांगणार?
"लाइफ लाइन फाउंडेशन' या संस्थेने तरुणांमध्ये रहदारीच्या, वाहने चालविताना घ्यावयाच्या काळजीच्या अन्‌ त्यासंबंधीच्या नियमांच्या शिस्तपालनासाठी प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयांमधून युवकांना याबद्दल जागरूक करून अशा जागरूक युवकांकडून समाजप्रबोधनाचा हा उपक्रम आहे. अनेक युवक यात स्वयंसेवी भावनेतून सहभागी झाले आहेत. मला वाटते, वाहनचालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच पादचाऱ्यांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे. लाल दिवा असताना वाहन थांबवावे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये, चुकीच्या बाजूने व प्रवेश बंदमधून जाऊ नये, पदपथावरून वाहन चालवू नये, हेल्मेट वापरावे, सीटबेल्ट लावावा, अशा सर्व गोष्टी जशा वाहनचालकांना सांगितल्या जातात तसेच पादचारी पूल, पादचारी मार्ग यांचा वापर करावा, सिग्नल असलेल्या ठिकाणीच झेब्रा पट्ट्यावरून चौकातील रस्ता ओलांडावा, रस्ता ओलांडत असताना मोबाईलवर बोलू नये, जोरात जाणाऱ्या वाहनांच्या मधून रस्ता ओलांडू नये, या प्राथमिक गोष्टी पादचाऱ्यांना सांगणे गरजेचे आहे. सिग्नल चालू असताना रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना पोलिसांनी अडवून दंडात्मक कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by padmakar punde