सलामी

रोहिणी भागवत
शुक्रवार, 14 जून 2019

रणथंबोरच्या अरण्यात वाघ पाहायला भटकलो. वाघ नाही, पण जंगलात मुक्त वावरणारे अस्वल पाहायला मिळाले.

रणथंबोरच्या अरण्यात वाघ पाहायला भटकलो. वाघ नाही, पण जंगलात मुक्त वावरणारे अस्वल पाहायला मिळाले.

आम्ही रणथंबोरचे अभयारण्य बघायला गेलो होतो. उघड्या बसने पंचवीस-तीस प्रवासी दुपारी जंगल सफारीसाठी निघालो. दुतर्फा ओसाड वने, धुळीचे रस्ते, भरपूर उबाडखाबाड असलेल्या रस्त्याने जात होतो. अधूनमधून माकडे, लांडोर, पक्षी, नीलगाय, सांबर दिसत होते. चार तास जंगलात फिरूनही वाघोबाचे दर्शन झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता थंडीच्या जामानिम्यासह आम्ही सहा जण उघड्या जीपने पुन्हा व्याघ्र दर्शनासाठी निघालो. थोडे अंतर गेल्यावर चालकाने आम्हाला वाघाच्या पाऊलखुणा दाखवल्या. त्या स्पष्ट होत्या. जाताना वाटेत ओबडधोबड धोंड पडलेले दिसले. चढ-उतारावरून कोरड्या नाल्यातून जाताना चालक विशिष्ट आवाजात "होल्ड टाइट' असे सांगे. मध्येच पक्ष्यांचे विशिष्ट आवाज ऐकून चालक प्राण्यांची चाहूल घेण्यासाठी खुणेनेच शांत बसायला सांगे. वाटेत इतर गाड्यांच्या चालकांनाही वाघाबद्दल चौकशी करून त्या दिशेने गाडी न्यायचा. पण, व्यर्थ.

तेवढ्यात चालकाने जीप थांबवत शांत राहायला सांगितले. आम्ही चिडीचूप. त्याने बोटाने डाव्या बाजूला इशारा केला. आम्हाला एक मोठे काळे केसाळ अस्वल संथ गतीने येताना दिसले. हळूहळू आमच्या जीपसमोर अवघ्या दहा फुटांवर ते आले. त्याने समोरचे दोन पाय उचलले आणि मागच्या दोन पायांवर उभे राहिले. त्याची दृष्टी आमच्याकडेच असल्याने क्षणभरासाठी सर्वांच्याच हृदयाचे ठोके थांबले असणार. चालकाला शस्त्र ठेवण्याची परवानगी नसल्याने तो व आम्ही सर्व जण निःशस्त्र होतो. कोणत्याही क्षणी झेप घेतली, तर काय होणार, हा विचार मनात आला. शेवटी जंगली हिंस्त्र प्राणीच असल्याने सर्वांचीच भीतीने गाळण उडाली होती. पुढच्याच क्षणी ते उजव्या बाजूने निघून जंगलात दिसेनासे झाले. सर्वांच्याच जिवात जीव आला. जंगलातील अस्वलाचा मुक्त संचार आम्ही पहिल्यांदाच पाहिला. अस्वल गेल्यावर चालक गमतीने म्हणाला, ""साहब, भालू सलाम करके गया.'' खरेच होते. सलामीच्या "पोझ'मधील त्याचे छायाचित्र सर्वांनीच काढले होते. वाघ नाही, निदान अस्वल दिसले. एव्हाना दिवस उजाडण्याने वाघ दिसणे शक्‍य नसल्याने आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by rohini bhagwat