कष्टाची सायकल

muktapeeth
muktapeeth

सायकल ही आमची गरज होती. मॅट्रिकनंतरच्या सुटीत काम करून मिळवलेल्या पैशाने पहिली सायकल विकत घेतली.

पूर्वी पुणे हे सायकलींचे व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सायकल हे शहरातील प्रवासाचे सर्वसामान्यांचे मुख्य साधन होते. सायकल पुण्याच्या रस्त्यावरून चालवण्यासाठी महापालिकेकडून बिल्ला घ्यावा लागत असे. त्या काळीही पोलिस दबा धरून बसत व डबलसीट जाणाऱ्या सायकलवाल्याला पकडत. काळोख पडल्यावर पुढेमागे दिवा नसेल तर पकडत असत. शाळा-कॉलेजात जाण्यासाठी आम्हा सगळ्यांकडे सायकलीच असत त्या वेळी. आता पालक आपल्या मुलांना वाढदिवसाला सायकल घेऊन देतात. तेवढाच त्याचा व्यायाम होईल म्हणून. फार थोडी मुले माध्यमिक शाळेत जाण्यासाठी सायकलचा उपयोग करतात. तर सांगायचे म्हणजे, स्वतः कष्ट करून सायकल विकत घेणे ही एक अभिमानाची बाब.
मॅट्रिकची म्हणजे जुनी अकरावीची परीक्षा झाली होती. शाळेला तीन महिन्यांची सुट्टी होती. या तीन महिन्यांत काही तरी काम करावे असा विचार केला. खडकवासला धरणाच्या दुरुस्तीचे काम अद्याप चालू होते. धरणावर काही काम मिळेल का याची सहज चौकशी केली, तर कामाची संधी चालून आली. धरणावरील मजुरांची हजेरी लिहिणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे असे दिवसभराचे काम होते. मी ते स्वीकारले. त्या वेळी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम सुरू होते. ग्राऊटिंगचे काम धरणावर केले जात होते. आसपासचे स्त्री-पुरुष कामाला येत असत. त्या वेळी अडीच महिने काम केले. वडील खडकवासल्याला एनडीएमध्ये नोकरीस होते. त्यांच्याबरोबर धरणावर जात असे. अडीच महिन्यांचा पगार अंदाजे चारशे रुपये हाती आला. लष्करातील व्यक्तींना त्यांच्या कॅंटीनमधून कमी किमतीत वस्तू मिळतात. वडिलांच्या ओळखीने एका मेजर साहेबांनी आपल्या नावावर तेथून सायकल घेऊन दिली. त्या वेळी 190 रुपयांना सायकल विकत घेतली व माझी पायपीट कायमची बंद झाली. या सायकलवर मी पर्वतीजवळून बीएमसीसी कॉलेजमध्ये जात असे. त्यानंतर नोकरीला जातानाही सायकल वापरत असे. स्वकष्टाने मिळवलेल्या पहिल्या सायकलीचे मोल अधिक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com