esakal | अल्बम पाहताना...
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

अल्बम पाहताना...

sakal_logo
By
सुधा डोके

अल्बम मनाला विरंगुळा, समाधान, गत जीवनातील प्रसंगांची आठवण करून देणारा खरा मित्र आहे. म्हणूनच मी सर्व अल्बम जपून ठेवते फक्त माझ्यासाठी!

काळ्या मेघांनी आकाशात गर्दी केली होती. वातावरण अगदी कोंदट, मलूल, प्रसन्न असे काहीच वाटत नव्हते. मन अगदी बेचैन झाले होते. ना वारा, ना पाऊस, ना पक्ष्यांचा किलबिलाट. अचानक मनात एक विचार चमकून गेला. कपाटातील सर्व अल्बम काढून एकेक पाहायला घेतला. पन्नास वर्षांपूर्वीचा अल्बम पाहाताना डोळ्यांसमोर शेत, विहीर, मोट, मोटेतून हौदात व हौदातून पाटात वाहणारे झुळझुळ पाणी, त्यात आम्ही तासन्‌तास डुंबत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत असू. घराशेजारचा गोठा. प्रशस्त घर, ओसरीवर मोठा झोपाळा, अंगणात ओटा बांधलेले तुळशी वृंदावन. त्या ओट्यावर आम्ही रात्री गप्पा मारीत असू. हे सर्व क्षण जणू कृष्ण-धवल रूपात जपून ठेवले होते. अल्बमच्या पानांच्या वाटेवरून मी त्या काळात पोचलेसुद्धा. हिरवीगार झाडी, स्वच्छ मोकळी हवा, भरपूर फळझाडे, गडी माणसांची कामाची गडबड, मधूनच मोटेच्या ललकाऱ्या कानी पडत. या सर्व वातावरणामुळे मी शेतातच वावरतेय असे वाटू लागले.

शाळेतील व कॉलेजातील मैत्रिणींचा अल्बम हातात घेतल्यावर पुन्हा शालेय व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. किती व कोठे कोठे वेड्यासारखे फोटो काढून अल्बम भरून पूर्ण केला होता. एकेकीची मुद्दाम दिलेली पोज अगदी पाहाण्यासारखी, तशीच हसण्यासारखी होती. त्या जीवनात किती धमाल केली हे अल्बमनेच सांगितले. प्रत्यक्षात आता त्या मैत्रिणी भेटत नाहीत; पण अल्बममधून भेटण्याचे समाधान मिळते. माझ्या लग्नाचा अल्बम खुणावतच होता. त्याचे मुखपृष्ठच खूप सुंदर. अल्बम पाहाताना एकदम त्या प्रसंगात समरसच होऊन गेले. ही छायाचित्रे नाहीच, मीच त्यात वावरते आहे, असाच मला भास होत होता. काही छायाचित्रे तर इतकी गमतीशीर आलीत की हसता हसता पुरेवाट. छायाचित्रकारसुद्धा जरा रोमॅंटिकच होता म्हणा! सर्व अल्बम चवीचवीने पाहून पुन्हा प्रसन्न झाले. लग्नानंतर आम्ही खूप फिरलो. प्रत्येक ठिकाणची छायाचित्रे आम्ही जपून ठेवली आहेत. ती पाहताना मनाची बेचैनी दूर होते.

loading image