अवधान दिजो...

सुहास मुंगळे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला.

गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला.

समर्थ रामदासांनी म्हटले आहे, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे.' समर्थांचा अनुभव आपणही रोजच घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येतात. त्याला धीराने तोंड द्यायचे असते. अर्थात हे प्रत्येक वेळी प्रत्येकाला प्रसंगात सुचेलच असे नाही. जो सावधान असतो, म्हणजे स-अवधान देऊ शकतो तो धीराने प्रसंगातून पार होतो. साधारण पाच वर्षांपूर्वी माझ्यावरच एक प्रसंग गुदरला होता आणि पत्नीने अवधान राखल्याने थोडक्‍यात निभावले होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी उठून स्नान झाल्यावर देवाची पूजा केली. पोथी वाचली. नेमका त्याच वेळी गॅस संपला. म्हणून नवा सिलिंडर लावला. पण? शंकेची पाल मनात चुकचुकली. गॅसचा वास येऊ लागला, म्हणून तो बंद केला. देवघराच्या शेजारीच गॅस सिलेंडरची जागा आहे. वास येऊ लागला तशी दारे, खिडक्‍या उघडल्या. वीज बंद केली. जेवढी काळजी घ्यायची तेवढी घेतली. गॅसचा वास आता येत नव्हता. मग पुन्हा देवघराकडे वळलो. आरती करायची म्हणून कापूर पेटवला आणि.. दाराच्या फटीतून क्षणार्धात आगीचा मोठा लाल गोळा आत आला माझ्या पायावर, मांडीवर, हातावर.

क्षणभर काहीच कळले नाही. मोठ्याने ओरडायचा प्रयत्न केला. पण... तोंडातून शब्द फुटेना. माझी पत्नी स्मिता पलीकडे भांडी घासत होती. तिने पाहिले आणि सेकंदाच्या आत पाण्याची अर्धी बादली माझ्या अंगावर टाकली. बाजूला ओढले. अंग थरथरत होते. शेजारीच डॉ. हिरेन निरगुडकर राहतात. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी औषध दिले. पाच तास आराम केला. पण झोप काही येत नव्हती. महापालिकेतील सहकारी अनुपमा पिंपळे यांनी एक विशिष्ट मलम दिले. जखमा भरल्या. ही सत्त्वपरीक्षाच होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by suhas mungle