साद दे आता

सुजाता लेले
शुक्रवार, 31 मे 2019

आम्ही मैत्रीचा हात पुढे केलाय, आता फक्त तुझी साथ हवीय. शेवटी मैत्रिणी आहोत आपण. तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत.

आम्ही मैत्रीचा हात पुढे केलाय, आता फक्त तुझी साथ हवीय. शेवटी मैत्रिणी आहोत आपण. तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत.

असं वाटतं की उन्हाळ्यात दिवसभराचे घामाचे कपडे संध्याकाळी बदलावेत. गजरा माळावा. फ्रेश व्हावे. पण आपण स्त्रिया असल्यामुळे उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईची आपल्याला जाणीव होते अन्‌ घामेजले कपडे बदलण्याचा विचार सोडून देतो. फक्त नैसर्गिक सुगंध आणि डोक्‍यातली उष्णता कमी करणारा गजरा तेवढा माळतो. शेवटी आपण महिलाच नाही का? मग येतो पावसाळा. सुरवातीला आपल्याला छानचं वाटतो. पण घराबाहेर जायचासुद्धा वैताग येतो. कुठल्याही लग्न किंवा इतर समारंभांना जावेसेच वाटत नाही. कारण एकच कपडे खराब होतील. राहिला आता हिवाळा. सुरवातीला गुलाबी थंडी छानच असते. व्यायाम करायचा उत्साह वाढतो. छान छान कपडे घालता येतात. जास्त थंडी पडू लागली की मग छान छान कपड्यांवर स्वेटर, शाल लपेटावी लागते. मग कपड्यांचे, दागिन्यांचे सौंदर्य लोकरीच्या कपड्यात झाकावे लागते. असो हे झाले आपले. पण आपली सर्वांची मैत्रीण, म्हणजे आपली सखी धरित्री. तिला विचारावेसे वाटते की, हे सखे, उन्हाळ्यात तू नंतर नंतर अगदी लंकेची पार्वती होतेस. पाचू, माणिक, हिरा, मोती, पोवळे अशा रत्नांना तुझ्यापासून दूर करतेस. पण त्यामुळे तू नाही गं छान दिसत. तुझे सौंदर्य या रत्नांमधे दडले आहे. आम्ही फक्त स्त्रियाच नाही तर सारे जण तुझे सौंदर्य पाहायला आतुरलेले आहोत. हे सखे (धरित्री सखी) तू पण दमलेली दिसते आहेस. असे असूनही पाण्यासाठी तू तहानलेली नाहीस का? आम्ही खूप चुकलेलो आहोत. आम्हाला क्षमा कर; पण तू आता हिरवीगार शालू नेस, त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या बुट्टयांची उधळण करत आमच्या मैत्रीला साद दे. सारे जण आता उन्हाळ्याला कंटाळलो आहोत. तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे. आम्ही पण सहन केले; पण आता हा वैशाख वणवा नाही सहन होत. ऐकशील ना गं मैत्रीणींचे. आमच्या हाकेला साद देशील ना गं. काळ्या ढगांना जमव आणि या काळ्या धरित्रीवर बरसायला सांग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by sujata lele