ओरखडा

मधुरा धायगुडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

समारंभात सगळेच आनंद घेत असतात. अशावेळी दुसऱ्याचा आनंद हिरावला जाईल असे काही आपल्याकडून घडू नये, याची काळजी घ्यायला हवी.

समारंभात सगळेच आनंद घेत असतात. अशावेळी दुसऱ्याचा आनंद हिरावला जाईल असे काही आपल्याकडून घडू नये, याची काळजी घ्यायला हवी.

लग्नपत्रिका बघताना माझ्या मैत्रिणीचा अनुभव आठवला. एका आमंत्रणानुसार लग्नसमारंभाला उपस्थित राहिलेली माझी मैत्रीण लग्न आटोपल्यावर परतली ती नकारात्मक होऊनच. त्यानंतर गेली अनेक वर्षे कुठल्याही समारंभास न जाण्याचा तिचा निर्णय ती पाळते आहे. असे काय झाले असेल, की तिच्या मनात तो अनुभव घर करून बसला असेल! खरे तर लग्नसमारंभास नातीगोती, पै-पाहुणे, दागदागिने यांची रेलचेल; पण अशा समारंभातही एखाद्याच्या दिसण्यावरून, कपड्यावरून व्यक्तीची किंमत करणारे बघायला मिळतात. अशा आनंदाच्या क्षणी कटुतेच्या अक्षता सारखे डोक्यावर टाकणारे भेटतात अन् नकळत इतरांना दुखावतात. पण, हे टाळायला हवे. आपल्या या छोट्या आनंदी चेष्टेने एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, याचा विचार प्रथम हवा. लग्न काय होत राहतात, त्यात काय एवढे आम्ही विसरूनही जातो; पण एखाद्याच्या आयुष्यात ते एखादे लग्न कायमचा ओरखडा देऊन जाते. अगदी माझ्या त्या मैत्रिणीसारखे. तिलाही हक्क होता आनंदी राहण्याचा, पण..!

आज एवढ्या वर्षांनंतरही तिच्या मनावर पडलेला तो ओरखडा तसाच घेऊन ती वावरते आहे. एखाद्याच्या मनात चाललेल्या द्वंद्वांना आपण कसे ओळखणार? विसरून जायचे असे म्हणणारे त्या प्रसंगाने झालेल्या यातना त्या व्यक्तीने अनुभवलेल्या असतात, हे विसरतात. मनावर उमटलेल्या ओरखड्यांना पुसून टाकणे कधीच शक्य नसते. अगदी कितीही ठरवले तरी. माझ्याकडून कुणी दुखावले, तर त्याच्यावर फुंकर घालून आपण ती मनातील आग शांत करण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा. आम्हाला काय करायचे, असे विधान न करता अशा समारंभात माझे लक्ष अशाच ठिकाणी प्रथम जाते, कदाचित मी पटकन दुसऱ्याचे मन ओळखू लागले. अन् मग ओळख नसतानाही त्या व्यक्तीला बोलते करण्याचे काम मी करते. नव्हे, नकळत माझ्या हातून ते घडते. ‘चला, अजून एक समारंभ’ असे म्हणून मी पुढच्या कामाला लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth madhura dhaigude write article