सिक्कीमच्या राजभवनात (मुक्तपीठ)

vidya khaladkar
मंगळवार, 5 जुलै 2016

राज्यपालांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो. चुरचुरीत विनोद, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबीही त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता...

राज्यपालांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो. चुरचुरीत विनोद, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबीही त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता...

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेने अलीकडेच सिक्कीम, गंगटोक, दार्जिलिंग अशी काही दिवसांची सहल आयोजित केली होती. सिक्कीमला निसर्गसौंदर्याचे मोठे वरदान लाभले आहे. निसर्गाचे अद्‌भुत चमत्कार, कडेकपाऱ्यांतून कोसळणारे धबधबे, आकाशाला गवसणी घालणारे कांचनगंगा हे हिमालयातील सर्वांत उंच शिखर आणि त्या शेजारची लहान-मोठी बर्फाच्छादित हिमशिखरे, तऱ्हेतऱ्हेची फुले, दऱ्यांतून खळाळणाऱ्या नद्या, श्‍वास रोखून धरणारे नागमोडी रस्ते, दऱ्याखोऱ्या, पर्वत, धुके, ढग, पाऊस अशी निसर्गाची मुक्त उधळण सर्वांनी अनुभवली!

पण या सगळ्यावर कळस चढविला, तो सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संस्मरणीय भेटीने! मूळचे मराठी असलेले सिक्कीमचे राज्यपाल आपल्याला भेटतील का, असा प्रश्न आमच्यापैकी काही जणांच्या चर्चेत आला. अखेर आम्ही सगळ्यांनी ठरवले, "बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे?‘ पाच-सहा कारमधून आम्ही 30-35 जण राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर जाण्यास निघालो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती, की खरंच राज्यपाल आपल्याला भेटतील का? तेथे पोचल्यावर मूळचे कऱ्हाडचे असलेले व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी आमचे आपुलकीने छान स्वागत केले. अतिथिगृहाच्या आलिशान दालनात गरमागरम भजी, चहा, बिस्किटे असा मेनू होता. त्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यावर आम्ही चालतच राजभवनावर पोचलो. त्या परिसरात सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यासाठीचे रमणीय अतिथिगृहही दिसले. संध्याकाळ झाल्यामुळे राजभवनातील सुरक्षारक्षकांचा "रिट्रिट सेरेमनी‘ म्हणजे ध्वज सन्मानाने उतरविण्याचा समारंभ पाहता आला. हिरवागार गालिचा आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांनी राजभवनाचा परिसर नटला होता. राजभवनातील "आशीर्वाद भवन‘ येथे आम्हा सर्वांना नेण्यात आले. सिक्कीमच्या आतापर्यंतच्या सर्व राज्यपालांची छायाचित्रे तेथे ओळीने लावण्यात आलेली आहेत. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सर्व कर्मचारी वर्ग सिक्किमीच दिसत होता. काही मिनिटांतच राज्यपाल तेथे पोचले. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही सारे भारावून गेलो. त्यांनी अनौपचारिकपणे सर्वांशी संवाद साधायला सुरवात केली. चुरचुरीत विनोद, लहान-मोठे किस्से, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबी त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता. सिक्कीममधील मुक्कामात कोणती काळजी घ्यावी, खरेदी काय आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शनही केले. पुण्याचे काही जण भेटायला आले होते. त्यांना नथुलापासपर्यंत जाण्यासाठी सर्व मदत करण्याच्या सूचना राज्यपालांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. आम्हालादेखील दुसऱ्या दिवशी पहाटे कांचनगंगाचे विहंगमय दृश्‍य पाहण्यासाठी राजभवनावर परत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. सर्वांना मनसोक्तपणे त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढू दिली. बोलताना तेथे काम करणाऱ्या सिक्किमी अधिकारी आणि समस्त कर्मचाऱ्यांचे कौतुक करायलादेखील ते विसरले नाहीत. राजभवनातील आमचे तीन तास कसे गेले, कळलेच नाही! तो सारा कालावधी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने जणू स्वप्नवत्‌ होता! राजभवनातून परतताना प्रत्येकजण आनंदात डुंबत होता.

सर्वसामान्यांचे स्वागत राज्यपालपदावरील व्यक्ती किती सन्मानपूर्वक करू शकते, याचा वस्तुपाठच श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिला. परक्‍या भागात मराठी माणसांचे अशा प्रकारे स्वागत होणे, हा आमच्या जीवनातील भाग्ययोगच म्हणावा लागेल!

एकूणच एखाद्या राज्याच्या राज्यपालांचे पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे असते. सुरक्षारक्षकांचा सदैव गराडा आणि राजनैतिक शिष्टाचार पाळावे लागत असल्यामुळे राज्यपालपदावरील व्यक्ती नागरिकांना भेटून मनमोकळेपणाने बोलत आहे, असे चित्र सहसा पाहावयास मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांना त्या पदावरील व्यक्तींना भेटण्याचा योग अपवादानेच येतो! या पार्श्‍वभूमीवर सिक्कीमच्या राजभवनातील त्या तीन तासांच्या सुखद, रमणीय आठवणी आमच्या मनात कायम रुंजी घालत राहतील, हे नि:संशय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth vidya khaladkar