पाणी'दार छंद 

रमेश वैशंपायन 
बुधवार, 15 मार्च 2017

मंतरलेले पाणी, पूजेचे तीर्थ, पवित्र गंगाजल हे आपल्या जीवनात येणारे पाण्यासंबंधीचे नेहमीचे संदर्भ आहेत. "बारा गावचे पाणी' पिण्याचा अर्थ आपल्याला माहीत असतो; पण एखाद्याला "बारा गावचे पाणी' गोळा करण्याचा छंद असेल तर! 

मंतरलेले पाणी, पूजेचे तीर्थ, पवित्र गंगाजल हे आपल्या जीवनात येणारे पाण्यासंबंधीचे नेहमीचे संदर्भ आहेत. "बारा गावचे पाणी' पिण्याचा अर्थ आपल्याला माहीत असतो; पण एखाद्याला "बारा गावचे पाणी' गोळा करण्याचा छंद असेल तर! 
पाणी गोळा करण्याचा छंद मला अचानकपणे लागला. काही वर्षांपूर्वी मी काशी, गया, प्रयाग, अलाहाबाद अशी त्रिस्थळी यात्रा केली. त्या वेळी माझी आई मला म्हणाली, ""काशीहून येताना मला गंगाजलाचा एक गडू घेऊन ये!'' त्याप्रमाणे मी तो आणला. आमच्या देवघरात तो विराजमान झाला व त्याची रोज देवाबरोबर पूजा केली जाते. जपानी लोकदेखील तेथील फुजियामा पर्वतावरील पाणी पवित्र मानून भक्तिभावाने जतन करतात, असे ऐकले होते. माझे जावई सात- आठ वर्षांपूर्वी जपानला गेले होते. त्यांना मी फुजियामा येथून पाण्याची बाटली आणण्यास सांगितले. ही माझ्या संग्रहाची सुरवात, असं म्हणायला हरकत नाही. 
जगातील प्रत्येक जण पाणी देवस्थानी मानून या ना त्या प्रकारे पंचमहाभूतांची पूजा करत असतो. पृथ्वी- आप- तेज- वायू- आकाश यांना पंचमहाभूतं कशासाठी म्हणतात, हा प्रश्‍न आहे. कारण भूतं म्हणजे अशुभ, भीतीने थरकाप उडवणारे अशी सर्वसामान्यांची ठाम समजूत असते. त्यातील जलामुळे तर अनादीकालापासून पृथ्वीवरील सृष्टी विविध अंगाने सुजलाम्‌ - सुफलाम्‌ होते आहे. पावसाच्या पाण्यात गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या अशी बालगीतं म्हणत हुंदडणारी मुलं असोत किंवा यौवनाला साद घालणारं श्रावणात घननिळा बरसल्या रिमझिम रेशीमधारा हे अवीट गोडीचं गाणं असो ते मनाला आनंद देतं. मृग नक्षत्र बरसल्यावर पाण्याने चिंब भिजलेली जमीन पाहून त्याच्या डोळ्यातील आनंद त्याचे अनेक फोटो काढले तरी त्याची अनुभूती त्याची त्याला कळते. 
पहिल्या पावसाच्या पाण्याचं वर्णन आचार्य अत्र्यांनी कवितेमध्ये सुरेख केलं आहे. "उसळत- फेसाळत घुसळत जल वाहे चारी दिशांनी, आले नवे नवे पाणी'. पृथ्वीवरील 75 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे, तो म्हणजे समुद्र आहे. त्यातदेखील असंख्य प्रकारचे जलचर सुखाने नांदत आहेत. विष्णूचा मत्स्यावतार प्रसिद्ध आहे. महाप्रचंड अशा नदीचा उगम म्हणजे अंगठ्याएवढी पाण्याची धार डोंगरकपारीतून वाहत असते. तो उगम बघण्यात जेवढा आनंद असतो, तेवढाच संगमावर (त्रिवेणी) बोटीने जाऊन स्नान करण्यात असतो. कन्याकुमारीला तर तीन समुद्र एकत्र येतात. तिथे सागराची विशालता दिसते. म्हणून भारतातील सहली गंगोत्री- जमनोत्रीपासून थेट कुन्याकुमारीपर्यंत असतात. वेदामध्येदेखील एक जलसूक्त आहे. त्याच्या एका मंत्राचा हिंदी अनुवाद "जलमे अमृतोपम गुण है। तथा जलमे औषधी गुण है। हे देवो ऐसी जलकी प्रशंसासे आप उत्साह प्राप्त करे। उन जलधाराओंसे हमे धनधान्यसे परिपूर्ण करे। तथा कल्याणप्रद साधनोंसे हमारी रक्षा करे।' 
मी थायलंड, मलेशिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणी सहलीला गेलो होतो. तेव्हा थायलंडमधील अर्धा लिटर सीलबंद पाणी आणले. हल्ली परदेशात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सहजतेने उपलब्ध आहेत, त्यामुळे माझे काम सोपे झाले आहे. भारतातील बहुतेक पवित्र नद्यांचे जल मी आणले आहे. एवढेच नव्हे, तर मानसरोवर, बद्रीनाथ येथील सरस्वती नदीच्या उगमातील जल, अमरनाथ येथील पवित्र बर्फानी बाबांच्या मंदिरातील जलकुपी माझ्याकडे आहे. 
इतर धर्मीयांचे पवित्र जल मक्का (हज यात्रा)सुद्धा माझ्याकडे आहे. व्हॅटकिन सिटीमध्ये पोपने स्पर्श केलेले (होली वॉटर)सुद्धा तेथील गिफ्ट शॉपमध्ये मिळते (पण ते माझ्याकडे नाही). 
माझे कोणीही मित्र, नातेवाईक परदेशात जातात, तेव्हा त्यांना मी सांगतो की मला साबण, सेंट्‌स, चॉकलेट्‌स यापैकी काहीही आणू नका; पण तेथील त्या देशातील पाण्याची सीलबंद बाटली आणा; आणि विशेष म्हणजे सगळे जण याबाबतीत मला पूर्ण सहकार्य करतात. सगळ्यांना माझ्या या छंदाबद्दल आत्मीयता आहे. या बाटल्यांवरती विविध भाषांत माहिती लिहिलेली असते. जरी ती भाषा कळली नाही, ती लिपी कळली नाही, तरी बघताना मजा वाटते. अमेरिकेतील फक्त नायगारा धबधब्याचे पाणी माझ्याकडे आहे. 
पर्यटनाच्या दृष्टीने अनोखी आणि अपवादात्मक पर्यटनस्थळे म्हणजे व्हिएतनाम, लाओस, रशिया, स्वीडन, चीन, जपान आहेत. त्या देशातील जलकुप्याही माझ्या संग्रहात आहेत. दोन्ही ध्रुवांवरील बर्फाचे वितळलेले पाणी, आफ्रिका खंडातील महत्त्वाच्या शहरांतील पाण्याचे नमुने, इजिप्तशियन संस्कृती (पिरॅमिड) ज्या नाईल नदीच्या काठावर वाढली, फुलली त्या नदीचे पाणी मला मिळाले नाही. मला तर युनोमधील सहभागी असणाऱ्या प्रत्येक देशातील जलकुपी आणण्याची इच्छा आहे. 
प्रत्येक जलकुपीवर मी ती आणणाऱ्याचे नाव, तारीख व संबंधित नदीचे नाव लिहून ठेवतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth writes Ramesh vaishampayan