इंग्लंडमधील चहापान (मुक्‍तपीठ)

गायत्री क्षीरसागर
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

पुण्यातील महाविद्यालयीन युवती शांतिदूत बनून इंग्लंडमध्ये गेल्या. तेथील रीतीरिवाज, पदार्थ शिकल्या. परतताना त्यांनी यजमानांसाठी जंगी ‘टी पार्टी’ आयोजित केली होती. हा अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता. 

पुण्यातील महाविद्यालयीन युवती शांतिदूत बनून इंग्लंडमध्ये गेल्या. तेथील रीतीरिवाज, पदार्थ शिकल्या. परतताना त्यांनी यजमानांसाठी जंगी ‘टी पार्टी’ आयोजित केली होती. हा अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता. 

चहाला वेळ लागत नाही, परंतु वेळेला चहा मात्र लागतोच. तसा चहा या पेयाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र भारतीय चहा हा केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही तेवढाच प्रसिद्ध आहे. बरे, हे पंधरा दिवसांपूर्वीच प्रत्यक्षात अनुभवले, तेही इंग्लंडमध्ये. ‘लीला पूनावाला फाउंडेशन’ तर्फे, पुण्यातील विविध शाखांमध्ये पदवी घेणाऱ्या आम्हा मुलींना ‘पीस ॲम्बॅसॅडर प्रोग्राम’ (शांतिदूत) म्हणून निवडण्यात आले. आम्हाला ‘आशा सेंटर’, ग्लॉस्टरशायर येथे, तीन आठवड्यांच्या कार्यशाळेत, वैयक्तिक आणि सामाजिक विकास कसा करावा, जगामध्ये शांतता आणि आनंद निर्माण व्हावी, यासाठी स्वतःपासून सुरवात करावी, समाजातील विविध घटकांना कशी मदत करावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा सर्व खर्च लीला पूनावाला फाउंडेशनने केला होता. 

या कालावधीत आम्ही ब्रिटिश ब्रेकफास्टचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच एकेदिवशी जवळच असणाऱ्या ग्रेन्ज गावातील विशेष मुलांनादेखील भेटलो, त्यादिवशी आम्ही त्यांच्या सोबत एका गार्डनमध्ये बसून त्यांनी बनविलेला ‘टिपिकल ब्रिटिश टी’देखील प्यायलो. तेथून निघताना त्यांनी भारतीय चटकदार, चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली.

तसेच तेथे आमच्यासोबत नेपाळ, तुर्की, इटली, स्पेन, पॅलेस्टाइन, जर्मनी, लंडन, फ्रांस, पोलंड, युक्रेन इत्यादी देशांमधून आलेलेही होते, ते आमचे आता खूप चांगले मित्र-मैत्रिणी झाले आहेत. त्या सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी आम्ही मुलींनी शेवटच्या दिवशी भारतीय टी पार्टी आयोजित केली.

त्यादिवशी आजूबाजूच्या गावांतील काही लोक आणि आम्ही सगळे मिळून जवळ - जवळ ७० ते८० जण या समारंभासाठी उपस्थित होतो. त्यांना भारतीय कला आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याची आमची जबाबदारी होती. पूर्व तयारी म्हणून आम्ही पुण्यातून निघताना दर्जेदार चहा पावडर, जिरे, मोहरी, काही मसाले, गवती चहा, पोहे ते अगदी अस्सल पुणेरी बाकरवडी, खाकरे आणि लसणाच्या चटणीपर्यंत जे आपल्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देतील असे जिन्नस सोबत घेऊन गेलो होतो. तेथे राहात असताना आम्ही त्यांच्या संस्कृतीलाही आपलेसे करून घेतले आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही इंग्लिश क्वीन केक (आपल्याकडील कप केक) आणि स्कोन्स (जॅम आणि क्रीम लावून खाता येतील असे कप केक) हेदेखील बनायला शिकलो.  

आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे जंगी स्वागत कशाप्रकारे करता येईल याची आम्ही पुरेपूर तयारी केली होती. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा म्हटला की पोहेदेखील आलेच. त्याचबरोबर काहीतरी चमचमीतही असावे म्हणून आम्ही पापडीचाट, बाकरवडी आणि आम्ही बनविलेले क्वीन केक, स्कोन्स टेबल वर मांडून ठेवले होते. एवढ्या दिवसांत एक कळले होते, की त्यांना जरासेही तिखट खाण्याची सवय नाही. परंतु, आपल्या चमचमीत पदार्थांसोबत दुसरे भारतीय गोड पदार्थही ठेवावेत असा आमचा विचार होता. तसेच तेथे ब्रेड आणि दूध अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. म्हणून स्वीट डीश म्हणून आम्ही शाहीतुकडा बनवला, त्यानंतर हे सर्व पदार्थ गार्निशिंग करून एका टेबलवर ठेवले.  

अगदी गवती चहा, मसाला चहा, ब्लॅक टी, आले घालून केलेला व फक्त वेलची पावडर घालून केलेला असे विविध प्रकारचे चहा आम्ही  - टी पॉट मध्ये तयार ठेवले होते. त्यातील चहा थंड होऊ नये म्हणून रंगबेरंगी टी पॉट कव्हरही घातले होते.  तसे त्यांना ब्रिटिश टी घेताना, लागेल तसे दूध घालून प्यायची त्यांची सवय, परंतु आपल्या भारतीय चहाची कमालच काही और होती. तेथील बहुतेक लोकांना आपल्याकडील भारतीय चहाबद्दल माहिती होती. सर्व जण अगदी थोडा थोडा चहा घेत सर्वच प्रकारचे चहा ‘ट्राय’ करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मात्र आपल्या पुणे - मुंबईतील प्रसिद्ध ‘कटिंग चाय’ची आठवण आल्याशिवाय राहिले नाही. खूप साऱ्या लोकांनी आम्हांला अगदी त्याची ‘रेसिपी’ विचारली. काही मित्र-मैत्रिणींनी तर ई-मेलवर त्याची सविस्तर प्रक्रिया पाठवायला सांगितली. खऱ्या अर्थाने आपला भारतीय चहा बहुचर्चित का आहे याचा प्रत्यय येत होता. 

त्यादिवशी खरे तर आम्ही त्यांच्याकडील ढगाळ, कधी ऊन तर क्षणातच पाऊस हे सगळे अनुभवले. पण या कार्यक्रमाच्या शेवटी आकाशातील इंद्रधनुष्य पाहून ‘आम्ही भारतीय मुलींनी इंग्लडच्या हवामानावर देखील तेवढीच जादू केली’, अशी तेथील लोकांची प्रतिक्रया ऐकून खरेच वाटले, की आपली शान भारी, आपली संस्कृती भारी, तसे तर आपले सगळेच लय भारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth

टॅग्स