माझा ‘पुरुषोत्तम’ अनुभव

माझा ‘पुरुषोत्तम’ अनुभव

नाटुकलं लिहिण्याचा आनंद झाला होता. नाटुकलं बसवताना धमाल आली होती. पण हे नाटुकलं करताना मुलांनी मिळवलेला आनंद पाहताना मला अधिक आनंद झाला. 

आमच्या शाळेतील नाट्यशिक्षिका भैरवीताई यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि म्हणाल्या, ‘‘लिहा नाटक!’’ लहान मुलांच्या विश्‍वाभोवती फिरणारं एक नाटुकलं अवघ्या तीन-चार दिवसांत लिहून ताईंना दाखवलं आणि ताई खूशच झाल्या. म्हणाल्या, ‘‘या वर्षीपासून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा घेणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ यांनी भालबा केळकर स्पर्धेची जबाबदारीही घेतली आहे. तर आपण आपल्या प्राथमिकच्या मुलांबरोबर हेच नाटक करू या ‘उतरड्या पुरुषोत्तम’साठी!’’ आणि आमच्या पुरुषोत्तमचा प्रवास सुरू झाला.

आधी नाटकासाठी मुलं निवडली. त्यातील पात्रे ठरवली. प्रसंगी एकदा दिलेली भूमिका काही तालमींनंतर बदलावीदेखील लागली. पण मुलांनी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांनी अगदी खिलाडी वृत्तीने ते मान्य केलं. असं का केलं वगैरे विचारून अजिबात हस्तक्षेप केला नाही. कारण आम्ही जे काही करतोय ते नाटकाच्या उत्तम सादरीकरणासाठीच आहे यावर त्यांचा पूर्ण विश्‍वास होता. नंतर तालमी सुरू झाल्या. पहिली ते चौथीच्या अवखळ मुलांच्या तालमी करणे म्हणजे आधी त्या सर्वांना एका जागी खोड्या न करता बसवणे, नंतर सर्व सूचना करणे इथपासून तयारी असते. जरा वेळ मिळाला की पळाले खेळायला, मग त्यांना परत एकत्र करायचं आणि प्रॅक्‍टीस सुरू करायची. त्याचदरम्यान नेमकी नाताळची सुटी आली. पण पालकांनी शनिवार, रविवारखेरीज इतर दिवशी मुलांना तालमीला पाठवले.

नाताळनंतर युनिट टेस्टच्या तारखा आल्या. पण परीक्षा आणि नाटकाची तालीम यांची योग्य सांगड घालायला शाळेने मदत केली. तालमी सुरू असताना काही मजेशीर किस्से व्हायचे. आमच्या नाटकातला दादा अर्णव दुसरीतला, तर त्याची धाकटी बहीण इरा चौथीतली, त्यामुळे सारखं त्याला दादा म्हणायचं म्हणजे तिला जरा जडच जायचं. तसंच आमचा हा दादा लहान असल्यामुळे जरा अल्लडच! त्यामुळे ‘अरे बाळा, तुला महत्त्वाचा रोल दिलाय, जरा सीरीयसली कर रे’, असं म्हटलं की तो सरळ म्हणायचा, ‘नको ना मग, मी तो शेवटचा छोटासाच रोल करतो, मला तोच आवडलाय’. खरंच लहान मुलांमधली निरागसता या निमित्ताने अनुभवायला मिळत होती. आपण मेन रोल म्हणजे काहीतरी ग्रेट करतोय या भावनेचा स्पर्शही त्याच्या बालमनाला झाला नव्हता.

मुलांना आपण करतोय ते नाटक आवडलं होतं, समजलं होतं, त्यामुळे तालमीला आल्याबरोबर आपापली ‘प्रॉपर्टी’ हातात घेऊन आणि शाळेतले स्टूल वगैरे आणून सेट तयार करून मुलं आमच्या सूचनेची वाट पहात तायर होऊ लागली. कधी कधी आमचा छोटा दादा खूप धावपळ करून दमायचा, मग त्याला जवळ घेऊन प्रेमाने समजावून सांगायचं, ‘बघ, धावपळ केल्यामुळे खोकला येतोय, दम पुरत नाहीये डायलॉग बोलताना. आता जरा घशाची काळजी घे. असं स्टेजवर झालं तर चालेला का?’ लगेच दुसऱ्या दिवशी येऊन ‘ताई मी काल गरम पाणी प्यायलो, दूध-हळद घेतलं’ वगैरे रिपोर्ट तयार. खूप मजा वाटायची.

अशा उल्हासित वातावरणात कधी कौतुक तर कधी ओरडा झेलत मस्त तालमी केल्या मुलांनी! स्पर्धेचा दिवस उजाडला. आमचं नाटक सकाळच्या सत्रातलं असल्यामुळे थंडीने कुडकुडतच सर्व मंडळी आपापली प्रॉपर्टी, मेकप यासहित सकाळी साडेसातला भरत नाट्य मंदिरच्या दारात हजर झाली. ग्रीन रुममध्ये दीड-दोन तास त्यांना शांत बसवणं तसं अवघडच काम होतं. पण ज्या संघाचा जास्त आवाज येईल त्यांचे गुण आधीच कमी होतील, ही सूचना त्यासाठी पुरेशी ठरली.

नाटकाचा सेट अगदी साधाच, पटकन लावता येईल असा होता. आमच्या निश्‍चयदादानी आम्हाला यासाठी मदत केली. तो आमच्या टीममध्ये इतका पटकन रुळला की बघणाऱ्याला वाटावं आम्ही बरेचदा एकत्र काम केलंय. इकडे मी छोट्या दादाला सांगतेय, ‘बाळा सेटवर जांभया देऊ नकोस हां, खोकला पण येऊ देऊ नको. सगळे आपापली प्रॉपर्टी नीट हॅंडल करा, खाली पाडू नका. जोरात बोला, मागेपर्यंत आपला आवाज जायला हवा वगैरे!’ आणि पडदा वर गेला. आम्हाला एकीकडे दडपण होतं, पण मुलांनी अजिबात न घाबरता इतक्‍या सहजपणे संपूर्ण नाटुकलं सादर केलं की मग वाटलं, खरंच आपण का मोठं झालो! पडदा पडला आणि टाळ्यांच्या आवाजांने भानावर आलो. ती मुलांच्या उत्तम कामगिरीची पावतीच होती. निकालाची उत्कंठा वाढत गेली. रात्री ताईंचा मेसेज आला व्हॉट्‌सॲपवर,‘आपलं नाटक... दुसरं आलंय’.  ग्रुपवर जल्लोष झाला.  हे नाटक माझ्या हातून लिहिले गेलं, त्यातून मुलांना आणि बघणाऱ्यांना आनंद मिळाला आणि तो आनंद द्विगुणित होऊन पुन्हा माझ्यापर्यंत पोचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com