प्रवासातच सांगता प्रवासाची!

- डॉ. कमलेश सोमण
मंगळवार, 3 जानेवारी 2017

अनेकांनी जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. हा प्रवास कशासाठी? कुठून येतो हा रस्ता आणि कुठे घेऊन जातो? हा प्रवास थांबतो, ते मुक्कामाचं स्थळ नसतं. मग अंतिम मुक्काम कुठे? कोणी पोचतं का तिथे?
 

अनेकांनी जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. हा प्रवास कशासाठी? कुठून येतो हा रस्ता आणि कुठे घेऊन जातो? हा प्रवास थांबतो, ते मुक्कामाचं स्थळ नसतं. मग अंतिम मुक्काम कुठे? कोणी पोचतं का तिथे?
 

प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत नानाविविध बाह्यघटकांचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, आपले आई- वडील, शिक्षक, मित्र, तसेच आपल्या परिसरातील वा स्वभाषेतील चिंतक, लेखक- कलावंत, काही महान अभिजात ग्रंथ. तसं पाहिलं तर हे सगळे घटक आपल्या मनासह आपलं व्यक्तिमत्त्व, चारित्र्य, तर काही वेळा आपली नियतीही घडवतात.
माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास, मला योग्य वेळी श्रेष्ठ प्रतीचे आत्मनिष्ठ प्रेमधर्मी आधुनिक तत्त्वज्ञ- लेखक भेटले. त्यांनी माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं आणि आपल्या प्रचितीनुसार परिवर्तनाच्या वाटा दर्शवल्या. या मनस्वी व्यक्तींची जीवनं म्हणजे साक्षात कार्यशाळाच आहेत. त्यांच्या सहवासातील संदर्भग्रहणातून एका अतूट संवादाचा व संगीताचा लाभ झाल्याची सफलता मला लाभली.

प्रारंभी डॉ. वि. प. महाजन, डॉ. वा. द. दिवेकर, मुकुंद गोखले, प्रा. द. दि. पुंडे, प्रा. गो. म. कुलकर्णी, प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख, तसेच नाटककार महेश एलकुंचवार यांची संपूर्ण नाट्यसृष्टी व नाट्यदृष्टी, गांधीवादाचे गाढे अभ्यासक प्रा. सु. श्री. पांढरीपांडे आणि शेरलॉक होम्सच्या कथा, संत तुकाराम, समर्थांचे मनाचे श्‍लोक यांच्यासह जे. कृष्णमूर्ती यांनी माझ्या मानसिक ऊर्जेला कृतिशील व प्रवाहित केलं. आजवर पंचवीस स्वतंत्र पुस्तकं आणि पंचाहत्तर मराठी अनुवाद अशी शंभर पुस्तकं प्रसिद्ध झाली. 
पीएच.डी.च्या निमित्ताने महेश एलकुंचवार यांच्या नाट्यसृष्टीचा अभ्यास कमालीचा अंतर्मुख करून गेला. विलक्षण तुटलेपणासह जगत असताना व्यक्तीच्या भागदेयात एकटेपणा, मृत्यूची अटळता, दुःख, वेदना, भूतकाळाचे जोखड, अंधारमय भविष्यकाळ, व्यक्तीचा वर्तमान दूषित करीत असतो. या रिक्ततेवर मात करण्यासाठी ‘स्व’कडून स्वेतरांकडे, विकृतीकडून आत्मज्ञानाकडे, संकुचित यातनाघरातून यातनांनी तडफडणाऱ्या विश्‍वघराकडे, तसेच दुःखाच्या कैदेतून करुणेकडे जात मोठ्या औदार्याने, नितळ माणुसकीने भरलेल्या मनाकडे जाण्याची दिशा एलकुंचवार आपल्या नाट्यसृष्टीतून दर्शवतात.

कृष्णमूर्तींच्या परिपूर्ण शिकवणुकीचा अभ्यास गेले तेवीस- चोवीस वर्षे चालूच आहे. माझ्या चिंतनशक्तीला पोसणाऱ्या या शिकवणुकीने मला अंतर्बाह्य जागं करीत बदलून टाकलं. मुख्य म्हणजे माझे सगळे भ्रम- भास- खोट्या प्रतिमा, तसेच कुठल्याही यशाचा किंवा पैसा-प्रतिष्ठेचा हव्यास कमी कमी होत गेला. संपूर्ण मुक्ततेत मोठ्या सजगतेने व सहजतेने साधेपणासह जगत असताना कुठल्याही प्रकारचे मापन, तुलना, अनुकरण, आवड- निवड, प्रेमशून्यता, इच्छांचा दबाव यांना ठामपणे नाकारत एका निःशेष रिक्ततेने, पूर्णप्रेमाने, संवेदनशीलतेने एका सृजनशील पातळीवर जगण्याची निकड कृष्णमूर्तींनी जाणवून दिली.

आपल्या नेणिवेत बदल करण्याची खरी आवश्‍यकता आहे. आयुष्याचा मुक्त प्रवाह वाहू देण्यासाठी कोणतीही स्मृती त्यात राहू नये म्हणून खऱ्या जाणिवेची आवश्‍यकता आहे. माणसाचे मन हे एखाद्या चाळणीसारखे असते, जे काही गोष्टी धरून ठेवते आणि काही सोडून देते. आपल्या इच्छा कितीही मोठ्या व्यापक, उदात्त असल्या, तरीही त्या खूप क्षूद्र आणि लहान गोष्टीच आहेत. त्याचे कारण इच्छा ही मनाने निर्मिलेली गोष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण इच्छापूर्तीच्या मागे आहोत, तोपर्यंत नैराश्‍य येणे क्रमप्राप्त आहे. इच्छापूर्तीचा आनंद ही आपली सततची इच्छा असते आणि आपल्याला हा आनंद सततचा हवा असतो. हा आनंद संपल्याबरोबर नैराश्‍य येते आणि त्यात वेदनाही असते. आपल्या आयुष्याचा प्रवाह हा कोणत्याही प्रतिरोधाशिवाय वाहू द्यायचा असेल, तर आपण आवडनिवड शून्यतेने तरल सावधानतेत जगले पाहिजे.

आपण एकाकी आणि आनंदी आहोत का? आपले आनंदी असणे, हे कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक सक्तीतून आले नाही ना, हे देखील पाहावे लागेल. आपले मन हे कोणत्याही अडथळ्यापासून मुक्त हवे. एकूण, प्रत्यक्षात जे आहे त्यासोबत राहण्यातील गुणवत्ता आता कळू लागली आहे. कृष्णमूर्तीची शिकवणूक पचवणे अवघड असले, तरी त्या दिशेने जाणे व नदीप्रमाणे स्वतःला शुद्ध करीत संपूर्ण वर्तमानाच्या या क्षणात राहणे, एवढे आपल्या निश्‍चित हातात आहे. अर्थात, या प्रवासाला मुक्कामस्थळ नाही. या प्रवासातच या प्रवासाची सांगता आहे. जो मनुष्य ‘काहीनाहीपणात’ जगतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी-आनंदी मनुष्य असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical dr. kamlesh soman