एक रंग गोरा अन्‌...

मीना हुन्नूरकर
बुधवार, 4 जानेवारी 2017

माणसाची योग्यता रंग-रूपावरून, कपड्यांवरून ठरवावी की गुणांवरून? प्रत्येक जण सांगताना तरी ‘गुणांवरून’ असेच उत्तर देईल. पण प्रत्यक्षात रंग, रूप, पैसा आणि कपडे यावर तुमची योग्यता बेतू लागते.
 

माणसाची योग्यता रंग-रूपावरून, कपड्यांवरून ठरवावी की गुणांवरून? प्रत्येक जण सांगताना तरी ‘गुणांवरून’ असेच उत्तर देईल. पण प्रत्यक्षात रंग, रूप, पैसा आणि कपडे यावर तुमची योग्यता बेतू लागते.
 

‘तुमची मुलगी गोरी असेल तरच आत या’ हे जळजळीत शब्द ऐकत आईला दारातूनच परतावे लागले. ही साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. कर्वे रस्त्यावरच्या एका डॉक्‍टर मुलाचे स्थळ कळले म्हणून आई चौकशीला गेली होती, त्या वेळेला वरपित्याकडून अपमानित होऊन ती घरी परतली होती. कारण आमचा रंग. गंमत म्हणजे त्याच गृहस्थांची मुलगी लग्नाची होती म्हणून पुढे ते माझ्या भावाची ‘स्थळ’ म्हणून चौकशी करायला आले होते.

आपल्या समाजात गोरा रंग आणि पैसा याला इतके महत्त्व आहे, की तो नसेल तर तुम्ही जगायला लायक नाही आणि तो असेल तर तुमच्याकडे बाकी काही नसले तरी चालेल. सगळे गुण तुम्हाला आपोआप चिकटतात. नाक नकटे असले तरी ते चाफेकळी वाटते, डोळे निस्तेज असले तरी ते पाणीदार वाटतात, उंची कमी असली तरी ती मुलगी लहानखुरी- नाजूक वाटते.

खरे सांगू का, मला गोऱ्या लोकांचा राग बिलकुल नाही. पण गोऱ्या रंगाचा उदोउदो करून बाकीच्यांना तुच्छ लेखणाऱ्यांबद्दल थोडी चीड आहे. ‘ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा?’ पण हे लक्षात कोण घेतो? रंगरूपाने सुंदर असणारे वाईट असतात असे माझे म्हणणे अजिबात नाही. उलट माझ्या ओळखीच्या काही देखण्या सुंदर व्यक्ती अतिशय चांगल्या स्वभावाच्या, निगर्वी आणि सर्व गुणसंपन्न आहेत. परंतु समाजातील काही लोक मात्र रंग-रूप-पैसा हेच फार महत्त्वाचे आहे, असे समजतात आणि त्यांच्या पुढे पुढे करतात. 

तुम्ही एखाद्या ऑफीसमध्ये गेलात, तुमचा पेहराव साधा असेल, भपका नसेल, तर तिथला शिपाईसुद्धा तुमच्याशी नीट बोलेलच याची खात्री नाही. तसेच तुम्ही जिथे काम करता तिथे येणारा प्रत्येक जण तुमच्याशी आदराने वागेलच असे नाही. तुमच्या खुर्चीचा मान ठेवला जाईल; परंतु तुम्ही सामान्य रूपाच्या आणि साध्या दिसणाऱ्या असाल तर एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सन्मानाने वागवले जाईलच असे नाही. सर्वसाधारणपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आधी उमटतो आणि मग बाकीच्या गोष्टी येतात. तुमची हुशारी, तुमचे वागणे-बोलणे, कलागुण, तुमची कामातील तत्परता, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतात. तरच तुम्ही थोडा प्रभाव लोकांवर टाकू शकता, अर्थात यासाठी बराच कालावधी लागू शकतो.

आमच्या कॉलेजमधली मोहिनी अतिशय देखणी, नाक चाफेकळी, दाताच्या कुंदकळ्या, काळेभोर लांबसडक केसांची वेणी, हरिणीसारखे डोळे वगैरे- संस्कृत नाटकातील नायिकाच म्हणा ना. तिच्या बरोबर दोघी जणी नेहमी असायच्या. त्या मात्र दिसायला अगदीच कुरूपात जमा. इतक्‍या सुंदर मुलीची या मुलींबरोबर मैत्री कशी झाली? कारण साधे होते, त्या दोघींच्या सामान्य रंगरूपापुढे मोहिनीचे सौंदर्य जास्तच खुलून दिसायचे. तसेच त्या दोघी अभ्यासात हुशार होत्या. त्या मोहिनीला अभ्यासात खूप मदत करायच्या. काळा-गोरा, गरीब-श्रीमंत हा दुजाभाव अगदी लहानपणापासून अनुभवाला येतो. शाळेच्या गॅदरिंगमध्ये गोऱ्या गोमट्या, श्रीमंत मुलींनाच भाग घेता येतो. त्यांना परीचा, राणीचा रोल मिळतो. सामान्य रूपाच्या मुलींना भाग घ्यायचा असेल तर चेटकीण, म्हातारी किंवा फाटके-तुटके कपडे घातलेली बाई हिचाच रोल मिळणार. 

वडिलांची बदली पुण्यात झाली तेव्हा शाळा सुरू झाल्या होत्या. मोठ्या शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून म्युनिसिपल शाळेत प्रवेश घेतला. तिथलेही शिक्षण चांगलेच होते याबद्दल वादच नाही. परंतु नंतर मोठ्या शाळेत गेल्यावर मात्र आमचे इंग्रजी कमी पडले. आम्ही म्युनिसिपल शाळेतले, आमचा पोशाख साधा तेव्हा मोठ्या शाळेच्या मुख्याध्यापिका चिडून म्हणाल्या, ‘इथून पुढे म्युनिसिपल शाळेतले गोळे घ्यायचे नाहीत.’ पण वर्गशिक्षिका खूप चांगल्या होत्या. त्यांनी सुट्टीत आमचा इंग्रजीचा चांगला अभ्यास करून घेतला. दाबला गेलेला चेंडू जसा दुप्पट वेगाने उसळी मारून वर येतो तसा आम्ही देखील मुख्याध्यापिका बाईंचे शब्द जिव्हारी लागल्याने, खूप मन लावून अभ्यास केला आणि इंग्रजीत प्रावीण्य मिळवायचा प्रयत्न केला. शाळेत माझ्या भाषा बऱ्या होत्या. हिंदी, संस्कृतमध्ये लेख, गोष्टी लिहून द्यायची. तेव्हा बाई मला दहा-दहा वेळेला विचारायच्या, मग, तूच लिहिलेस ना? कारण एकही चूक नाही याच्यात.’ 
पुढे जपानी शिकले. मोठ्या कंपन्यांमध्ये दुभाषाचे काम करता आले.

जपानमध्ये भेटलेले सर्व जपानी लोक चांगले होतेच. तोडकी-मोडकी का होईना जपानी भाषा बोलत होते म्हणून त्यांना मी परकी कधीच वाटले नाही. उलट कौतुकच वाटले, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मला माझ्या रंगरूपाचा न्यूनगंड वाटू दिला नाही. मात्र भारतात रंगरूप नसेल, तर तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागते. मराठीत एक म्हण आहे, ‘एक रंग गोरा अन्‌ दहा गुण चोरा.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical meena hunnurkar