‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’

‘कर्फ्यू’वाल्या शहरातील ‘ट्रॅफिक जॅम’

आपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.
 

सरहद आणि जम्मू-काश्‍मीर सरकारच्या वतीने पुढच्या महिन्यात कारगिल मॅरेथॉन शर्यत आयोजित करत आहोत, त्याकरिता पूर्वतयारीसाठी नुकतेच काश्‍मीरला गेलो होतो. कारगिलला जायचे तर जवळचा मार्ग म्हणजे व्हाया श्रीनगर. काश्‍मीर आणि त्यातही श्रीनगर म्हटले, की सगळीकडे दगडफेक, गोळीबार, अतिरेक्‍यांचे हल्ले, लष्करी जवानांचे बलिदान, जाळपोळ, कर्फ्यू, अतिरेक्‍यांचे एन्काउंटर असेच चित्र मनात येते; पण मॅरेथॉनची पूर्वतयारी करायलाच हवी होती. मनात धाकधूक होतीच. दिल्लीला पोचलो. आता श्रीनगरला जाण्याकरिता विमानाची वाट पाहताना विमानात आपल्याशिवाय कुणी असेल का, तिथे सुखरूप उतरता येईल का, विमानतळावरूनच परत पाठवले तर काय करायचे... असे नाना प्रश्न मनामध्ये यायला लागले. पण, विमान पूर्ण भरलेले होते. ऐनवेळी येणाऱ्यांना चढ्या दराने तिकिटे घ्यावी लागली होती. बरे, सगळे प्रवासी काश्‍मिरी होते असेही नाही. उलट काश्‍मिरी अभावानेच होते. गुजराती, बंगाली, मराठी अशा विविध भाषा बोलणारे ते सगळे पर्यटकच होते! मी कोड्यातही पडलो आणि किंचित आश्वस्तही झालो. एवढ्या संख्येने पर्यटक जात आहेत म्हणजे परिस्थिती तितकीशी वाईट नसावी बहुतेक...

श्रीनगरला उतरल्यावर प्रथम आम्ही काश्‍मीरचे माजी पोलिस महानिरीक्षक जावेद मगदुमी यांच्या घरी गेलो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काश्‍मीरमधली तणावपूर्ण परिस्थिती हाताळली होती. त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, ‘राजकीय पातळीवर हा प्रश्न योग्य तसा हाताळण्यात आपल्याला अपयश येते आहे, अन्यथा ७०-८० टक्के काश्‍मिरी भारताच्याच बाजूने आहेत. जे मूठभर फुटिरतावादी आणि पाकिस्तानवादी आहेत, त्यांना अधिकाधिक लोक आपल्या बाजूने वळवायचे असल्यामुळे ते सतत लष्कर आणि पोलिसांविरुद्ध कारवाया करत असतात. संरक्षण दलांकडून कारवाई व्हावी आणि त्याचा वापर करून जनमत आपल्या बाजूने वळवावे, असा त्यांचा डाव आहे. दुर्दैवाने आपण त्यांना हवे तसेच वागतो आहोत. पूर्वी विद्यार्थी यात नव्हते; पण त्यांच्या मनामध्ये भारतद्वेष फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा सापळा आहे. आपण त्यात अडकत चाललो आहोत. त्यामुळेच लष्कर आणि पोलिसांना एकीकडे अतिरेक्‍यांचा गोळीबार, तर दुसरीकडे जनतेची दगडफेक, असा दुहेरी मारा सहन करावा लागतो आहे.’ 

मगदुमी यांच्या घरून निघाल्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये फिरू लागलो. प्रसिद्ध लाल चौकात आम्ही पोचलो, तेव्हा वाहतुकीमुळे कोंडी झाली होती. तेथूनच घरी संपर्क साधला, तेव्हाही ‘वाहिन्यां’वरून लाल चौकात ‘कर्फ्यू’ असल्याची बातमी दिली जात होती आणि आम्ही ‘ट्रॅफिक जॅम’मध्ये अडकलो होतो. मोठ्या संख्येने पर्यटक, सामान्य लोक रस्त्यावर मोकळेपणाने फिरत होते. तिथे आमचा एक- दीड तास मोडला. पुण्यात असताना मनात दाटलेल्या भीतीचा कुठे लवलेशही नव्हता. आम्ही श्रीनगरच्या अधिकच धोकादायक अशा ‘डाउनटाउन’ भागात गेलो. तिथे शुजात चाशू या तरुणाला आम्ही भेटलो. तो पूर्वी श्रीनगरचा उपमहापौर होता. त्याच्याशी बोलताना आम्ही विचारले, ‘या भागात सारख्या दगडफेकीच्या घटना होत असतात असे आम्ही ऐकतो.’ त्यावर तो हसला आणि म्हणाला, ‘अहो, इथे अनेक गल्ली-बोळं आहेत. कुठल्यातरी एका गल्लीमध्ये कुणीतरी दगडफेक करतं आणि सगळे राष्ट्रीय चॅनेल्स दिवसभर तीच बातमी सारखी- सारखी आणि अतिरंजित स्वरूपात दाखवत राहतात. त्या गल्लीच्या तोंडाशी सगळे चॅनेलवाले कॅमेरे लावून दिवस- दिवस बसून असतात. मग काय, इथल्या काही लोकांना तेच हवं असतं आणि सोशल मीडियावर ते या बातम्या फिरवत राहतात.’  

त्यानंतर शुजात आम्हाला श्रीनगरच्या बटयार, अली कदल या भागात घेऊन गेला. तिथे अमृतेश्वर नावाचे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात रमेश पंडित नावाचा पंडित पुजारी राहतो. त्या अती संवेदनशील भागामध्ये तो एकटाच पंडित असूनही अनेक वर्षे व्यवस्थित राहतो आहे. (आता या शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचा त्याचा मानस असून शुजात चाशू, तसेच अनेक स्थानिक मुस्लिम तरुण श्रमदानास तयार आहेत; परंतु त्यांना त्यासाठी आर्थिक चणचण असून त्याकरिता ते प्रयत्न करत आहेत.) या मंदिराला लागूनच रींचान शाह मशीद आहे. काश्‍मीरमध्ये आलेला पहिला सूफी संत बुलबुल शाह याला रींचान शाह नामक तिबेटी वंशाच्या बौद्धधर्मीय राजाने स्वतः बोलावून त्याच्याकडून इस्लामची दीक्षा घेतली होती. शेजारी- शेजारी असलेल्या या मंदिर आणि मशिदीत आजही नित्यनेमाने पूजाअर्चा आणि नमाज सुरू असतात.  

याचा अर्थ तिथे सगळे काही आलबेल आहे असा नाही; पण त्याची जी तीव्रता आपल्याला सांगितली जाते, तितकी ती नक्कीच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com