नव्या वाटेने...

वंदना मांढरे
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नव्या वाटा शोधायचा छंदच होता म्हणा ना! जायच्या वाटेपेक्षा येतानाची वाट वेगळी असायला हवी; मग माणसे भेटतात नवनवी. अशाच एका थांब्यावरून नवी वाट सुरू झाली. करिअरचीही.

नव्या वाटा शोधायचा छंदच होता म्हणा ना! जायच्या वाटेपेक्षा येतानाची वाट वेगळी असायला हवी; मग माणसे भेटतात नवनवी. अशाच एका थांब्यावरून नवी वाट सुरू झाली. करिअरचीही.

मला नवीन वाटेने जाताना नेहमीच खूप आनंद मिळतो. लोकांशी ‘कनेक्‍ट’ राहायला नेहमीच आवडते. मला १९९२ मधली एक घटना अजून आठवते. महाविद्यालयात जाण्यासाठी बसथांब्यावर उभी होते. त्या दिवशी उशीर झाल्याने लोकल मिळणार नव्हती. म्हणून बससाठी आले होते. बस अजून आली नव्हती. थांब्यावर बरीच गर्दी होती. तेवढ्यात... माझी नजर एका ठिकाणी स्थिर झाली. पाहते तर बरेच जण होते. मग मलाच का एवढे अस्वस्थ वाटत होते. मी पुढे सरसावले... इकडे तिकडे पाहिले. अगदी मागेच मिठाईचे दुकान होते. पर्समधून पैसे काढले. वेगवेगळे बिस्किटाचे सहा पुडे घेतले. जवळच एक नळ होता, तिथे एक स्त्री आपल्या मुलाला पाणी पाजत होती. तीन-चार वर्षांचा असावा तो. आजारी असावा. भुकेमुळे रडत होता... नुसते हुंदके. अंगात प्राण नव्हते. आईही त्याची वैतागली होती. पण त्याला ती कुशीत घेऊन शांत करत होती, अजून एक मुलगी थोडी मोठी. पाच-सहा वर्षांची असावी, त्याला टाळ्या वाजून हसवण्याचा प्रयत्न करत होती. अगदी केविलवाण्या चेहऱ्याने... मनात आले की ही बाई या दोन मुलांना घेऊन कुठे चालली असेल?

बिस्किटांचे पुडे घेऊन त्या बाईजवळ गेले. मी म्हटले, ‘‘काय झाले? का रडतोय हुंदके देऊन तो? कुठे राहता तुम्ही? इथे काय करता आहात?’’ तिने बिस्किटे मुलांना देऊन बोलायला सुरवात केली होती. ‘‘मी इथेच मागच्या वस्तीत राहते, मुलगा खूप दिवसापासून आजारी आहे. काही खात नाही. उलट्या होतायेत... पोरांनी कालपासून काही खाल्ले नाही. त्यामुळे अंगात त्राण नाही.’’

जवळच रसाचे दुकान होते. तिला म्हटले, ‘‘तू तुझ्या मुलांना घेऊन तिथे ये. मला बोलायचेय तुझ्याशी.’’

मी रसाच्या दुकानात गेले. त्याला म्हटले, ‘‘यांना बसायला जागा मिळेल ना?’’ तो म्हणाला, ‘‘ताई दुसरे लोक दुकानात येणार नाहीत.’’ मी त्याला विनंती करून चार खुर्च्या बाजूला द्यायला सांगितल्या. तोपर्यंत ते आले. त्यांना तिथेच थांबवून मी चहाची किटली घेऊन फिरणाऱ्या मुलाला आवाज दिला. तिघांनीही आनंदाने चहा बिस्किटे खायला सुरवात केली होती. ती रडत बोलू लागली. ‘‘काल त्यानं खूप मारलं आणि बाहेर हाकलून दिलं. रात्रीपासून येथेच हाय. पोरगंसारखं आजारी असतं. त्याला दवाखान्याला न्यावं लागतं. मी बांधकामावर मजुरी करते; पण या पोरांच्या पायी आता या हप्त्यात गेलेच नाही. म्हणून लय मारले.’’

‘‘काय करतो नवरा?’’
‘‘एका हॉटेलात वडे बनवतो. तो खूप चांगला हाय; पण त्यालासुद्धा कामातून पोरांकडं बघायला सुट्टीच मिळत नाय, मालक कामावरून काढंल, याची भीती असती ना. ’’

‘‘कोणत्या हॉटेलमध्ये काम करतो?’’
मी तिला म्हटले, ‘‘हे बघ, उद्या तू सकाळी अकरा वाजता ये. जवळच तेरणेकर डॉक्‍टर आहेत. तू नक्की त्या दवाखान्यात जा. तुला पैसे द्यायचे नाहीत. त्यांचा गुण नक्की येतोच.’’ रिक्षासाठी तिला दहा रुपये दिले. मुलांच्या पोटात भूक बाकी होती. मी त्या मिठाईच्या दुकानातून तीन वडापाव, ढोकळा, दोन कॅटबरी घेतल्या आणि त्यांना दिल्या. तसा त्यांचा चेहरा हसता झाला. 

पुन्हा बसथांब्यावर आले. तेवढ्यात दोन बस एकामागोमाग आल्या. एक थेट कॉलेजला जाणारी, तर दुसरी त्या हॉटेलवरून जाणारी. मी क्षणाचाही विचार न करता दुसऱ्या बसमध्ये चढले. त्या छोट्याशा हॉटेलमध्ये गेले. एक जागा रिकामी दिसली. वेटर आला. त्याच्याकडे ‘त्या’ व्यक्तीची चौकशी केली. तो भांबावलेल्या चेहऱ्याने ‘हो-हो... इथेच काम करतो.’’ 

‘‘मॅनेजर आहेत का तुमचे?’’ लगेचच एका तिशीतल्या माणसाला घेऊन आला. ‘‘मॅनेजर आहे मी. काही घोटाळा झालाय का? त्या व्यक्तीने काही केलंय का?’’  

मी म्हटले, ‘‘काही गडबड नाही. मला त्या व्यक्तीशी भेट घालून द्या.’’ त्यांनी लगेच त्याला बोलावून घेतले. तो घाबरूनच मला पाहत होता. ‘‘काय झाले मॅडम?’’ मी मॅनेजरला सर्व समजावून सांगितले, ‘‘मुलांसाठी तरी या माणसाला एक दिवस सुट्टी द्या. काही करायचे असून काहीच करता आले नाही की चिडचिड होतेच; पण या सर्व परिस्थितीत जर त्याच्या मुलाला त्रास झाला तर... नोकरी जाऊ नये म्हणून सुट्टी घेता येत नाही. मुलांना घेऊन त्याच्या बायकोला कामाला जाता येत नाही, मग तो राग बायकोला मारून काढतो.’’ मॅनेजरने त्याला दुसऱ्याच दिवशी सुटी द्यायचे कबूल केले. 

रात्री तेरणेकर डॉक्‍टरांना भेटले. त्यांनी मुलाला तपासायचे कबूल केले. म्हणाले, ‘‘अगं चिमुरडे, तू एवढे केलेस तर मी त्याला पैसे न घेता तपासू नाही का शकत?’’ 

दुसऱ्या दिवशी दवाखान्याजवळ उतरले, तर समोर त्यांचे चौकोनी कुटुंब. ओळखीचे हसू चेहऱ्यावर. समुपदेशक म्हणून नव्या वाटेने मी चालत निघाले होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical vandana mandhare